नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सोमवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 33 पैशांची, तर डिझेलच्या दरात 58 पैशांची वाढ केली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरांत सलग 16 व्या दिवशी वाढ नोंदली गेली. परिणामी, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने आगळावेगळा उच्चांक नोंदवला आहे. त्या इंधनांच्या दरांमध्ये 18 वर्षांत एका पंधरवड्यात सर्वांधिक वाढ झाली आहे.
एप्रिल 2002 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरांवरील नियंत्रण काढून घेतले. त्या निर्णयानुसार दर ठरवण्याचे अधिकार सार्वजनिक कंपन्यांकडे देण्यात आले. त्यानंतर कंपन्यांनी पंधरवड्यानंतर दरांमध्ये बदल करण्यास सुरूवात केली. मे 2017 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज बदल करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. आतापर्यंत कुठल्याही पंधरवड्यात जास्तीतजास्त 4 ते 5 रूपये दरवाढ होत होती.
सार्वजनिक कंपन्यांनी दररोज किमती बदलण्याच्या प्रक्रियेला तब्बल 82 दिवस स्थगिती दिली. ती प्रक्रिया चालू महिन्याच्या (जून) 7 तारखेपासून पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हापासून सलग दरवाढीचे सत्र सुरू आहे. सलग 16 दरवाढींमुळे लिटरमागे पेट्रोल 8 रूपये 30 पैशांनी, तर डिझेल 9 रूपये 46 पैशांनी महागले आहे.
त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 79 रूपये 56 पैसे, तर डिझेलचा दर 78 रूपये 85 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत डिझेलचा दर आजवरचा सर्वोच्च आहे. याआधी देशाच्या राजधानीत 16 ऑक्टोबर 2018 या दिवशी डिझेलचा 75 रूपये 69 पैसे इतका सर्वोच्च दर नोंदला गेला होता. दिल्लीत 4 ऑक्टोबर 2018 या दिवशी नोंदला गेलेला पेट्रोल दराचा (84 रूपये) उच्चांक अजून अबाधित आहे.