Pakistan vs Sri Lanka Icc World Cup 2023 :- कुशल मेंडीस व सादीरा समरविक्रमा यांच्या अफलातून शतकांच्या जोरावर श्रीलंकेने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तानसमोर विजयासाठी 345 धावा करण्याचे आव्हान उभे केले.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हसन अलीने कुशल परेराला बाद करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, त्यानंतर पाथुम निसांकाने कुशल मेंडीससह डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले. निसांका 61 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 51 धावा करुन बाद झाला. दरम्यान मेंडीसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले.
मेंडीसने सादीरा समरविक्रमाच्या साथीत शतकी भागीदारी करताना संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. मेंडीसने वादळी फलंदाजी करताना शतक साकार केले. त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 122 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत अवघ्या 77 चेंडूत 14 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली व पाकिस्तानच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला.
Sri Lanka posts a challenging 344/9 after 50 overs. 🏏 Now, it’s time to defend the target!#LankanLions #SLvPAK #CWC23 pic.twitter.com/pIiThCUWbn
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 10, 2023
मेंडीस परतल्यावर सादीराने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत अर्धशतकी पल्ला पार केला. चारीथा असालंका व कर्णधार शनाका यांनी निराशा केली. यावेळी सादीराने धनंजय डीसील्व्हाच्या साथीत संघाचे त्रिशतक फलकावर लावताना वैयक्तीक शतकही साकार केले. शतकानंतर मात्र, तो लगेचच परतला. त्याने आपल्या 108 धावांच्या खेळीत 89 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 2 षटकार फटकावले. तळात दुनिथ वलिलागे यांने जिद्दी फलंदाजी केली व संघाला 9 बाद 344 अशी मजबूत स्थिती प्राप्त करुन दिली. पाकिस्तानकडून हसन अलीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. हॅरीस रौफने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 50 षटकांत 9 बाद 344 धावा. (कुशल मेंडीस 122, सादीरा समरविक्रमा 108, पाथुम निसांका 51, धनंजय डीसील्व्हा 25, हसन अली 4-71, हॅरीस रौफ 2-64).