ICC Cricket World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला भारतात 5 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये नुकतीच थाटात सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम आणि कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअवर सेमीफायनलचे सामने रंगतील. यंदाची विश्वचषक स्पर्धा ही राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेले सर्व 10 संघ एकमेकांविरोधात खेळतील. या स्पर्धेत एकूण सेमीफायनल आणि फायनल धरून 48 सामने होणार आहेत. राऊंड रॉबिनमधले टॉपचे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.
या विश्वचषकात भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्यांदा वेस्टइंडिजचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जगभरातील 10 विविध संघ आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह या विश्वचषकात विजेतेपदाच्या उद्देशाने सहभागी झाले आहेत. पण या विश्वचषकात इतर विदेशी संघामध्ये भारतीय वंशाचे अनेक खेळाडूदेखील आहेत. विश्वचषक ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात सर्व खेळाडूंना आपापल्या देशासाठी खेळण्याची इच्छा असते. मात्र, जेव्हा त्यांना संधी मिळत नाही तेव्हा ते अधिक मेहनत घेतात, पण काही क्रिकेटपटू असे आहेत की, त्यांना संघात संधी न मिळाल्याने ते दुसऱ्या देशात जातात. यातील काही खेळाडू भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत, जे सध्याच्या विश्वचषकात भारताविरुद्ध इतर विदेशी संघामध्ये खेळणार आहेत. अशाच 6 क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊया…..
1.केशव महाराज (गोलंदाज,दक्षिण आफ्रिका)
केशव महाराज हा दक्षिण आफ्रिका संघातील भारतीय वंशाचा खेळाडू मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील आहे. त्याचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. या आफ्रिकन खेळाडूचे भारताशी खास नाते आहे. केशव महाराजाचे पूर्वज 1874 मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत मजूर म्हणून गेले होते. पुढे त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. आता केशव विश्वचषकात भारताविरुद्ध खेळणार आहे. आत्तापर्यंत केशवने 32 एकदिवसीय सामन्यात 39 बळी आणि 161 धावा केल्या आहेत. विश्वचषकातील श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात त्यांन 2 बळी घेत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.
2. ईश सोधी (गोलंदाज,न्यूझीलंड)
न्यूझीलंड संघाचा दमदार गोलंदाज ईश सोधी हा मूळचा पंजाबमधील लुधियाना येथील आहे. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यांचे आजोबा फाळणीपूर्वी पाकिस्तानातील लाहोर येथील होते. जेव्हा तो चार वर्षांचा होता तेव्हा ते आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडमधील पापाटोएटो येथे गेले आणि स्थायिक झाले. सोधी याने पापाटोएटो हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. आता हा खेळाडू या विश्वचषकात भारताविरुद्ध खेळणार आहेत. त्याने 49 एकदिवसीय सामन्यात 61 बळी घेतले आहेत तर 201 धावा काढल्या आहेत.
3. राचिन रविंद्र (अष्टपैलू खेळाडू, न्यूझीलंड)
न्यूझीलंड संघाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरूध्द शतकी(123) आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सविरूध्द अर्धशतकी(51) खेळी करणारा राचिन रविंद्र हा मूळचा बंगळुरू येथील आहे. सचिन आणि द्रविड यांच्या नावापासून त्याचे राचिन हे नाव ठेवण्यात आले आहे. राचिन रवींद्र हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. रचिन रवींद्रचे कुटुंब आधी भारतात राहत होते पण काही समस्यांमुळे रचिन रवींद्रचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. यामुळेच अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रचे टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता या विश्वचषकात रचिन भारताविरुद्ध खेळणार आहे. राचिन यानं 14 एकदिवसीय सामन्यात 363 धावा तर गोलंदाजीत 14 बळी घेतले आहेत.
4. तेजा निदामगुरू (अष्टपैलू खेळाडू,नेदरलँड्स)
तेजा निदामनुरु हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तेजाचा जन्म हा आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे झाला. 2021 पर्यंत तो वर्कफ्लो मॅनेजमेंट कंपनीसाठी व्यवसाय विकास व्यवस्थापक होता, सहकारी नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय स्टीफन मायबर्गसोबत काम करत होता. क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी तो नेदरलँड्सला गेला. हा खेळाडू या विश्वचषकात भारताविरुद्ध खेळणार आहे. तेजा यानं आतापर्यंत 22 एकदिवसीय सामन्यात 527 धावा केल्या आहेत. तो गोलंदाजीही करतो पण अद्याप त्याला विकेट घेता आलेली नाही.
5. आर्यन दत्त (गोलंदाज,नेदरलँड्स)
पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात शानदार कामगिरी करणारा आर्यन दत्त हा खेळाडू मूळचा पंजाबमधील होशियारपूर येथील आहे. आर्यन दत्त यानं 27 एकदिवसीय सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत त्याचबरोबर 112 धावा काढल्या आहेत.
6. विक्रमजीत सिंग(फलंदाज,नेदरलँड्स) –
नेदरलॅंड्सच्या संघातील हा खेळाडू मूळचा पंजाबमधील जालंधर येथील आहे. विक्रमजीत सिंगचा जन्म पंजाबमध्ये झाला होता पण त्यानंतर तो नेदरलँडकडून क्रिकेट खेळला. विक्रमजीत यांचा जन्म 9 जानेवारी 2003 रोजी चीमा खुर्द, पंजाब, भारत येथे एका शीख कुटुंबात झाला. 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर त्यांचे आजोबा खुशी चीमा नेदरलँडमध्ये गेले होते. आता या विश्वचषकात विक्रमजीत भारताविरुद्ध खेळणार आहे. विक्रमजीत सिंगनं आतापर्यंत 27 एकदिवसीय सामन्यात 872 धावा काढल्या असून त्याचबरोबर गोलंदाजीत 7 बळीसुध्दा घेतले आहेत.