काबूल – पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अंतर्गत भानगडीमध्ये हस्तक्षेप करू नये असे अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमिद करझाई यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान यांना सुनावले आहे. अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा उदय होण्याची शक्यता इम्रान खान यांनी अलिकडेच वर्तवली होती.
अफगाणिस्तानबाबतच्या परिस्थितीबाबत विचार करण्यासाठी इस्लामी देशांची परिषद पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी इम्रान खान यांनी ही शक्यता वर्तवली होती. त्यावर करझाई यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमद्ये होणाऱ्या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी व्यक्त केला होता. हे आरोप सपशेल खोटे आहेत आणि अफगाणिस्ताबाबत पूर्वग्रह पसरवणारे आहेत, असे करझाई यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन म्हटले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारांबाबत अफगाणिस्तानच्यावतीने आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर बोलणे टाळावे, असा सज्जड दमच करझाई यांनी इम्रान खान यांना दिला आहे.
अफगाणिस्तानमधील सरकारमधील कित्येक वर्षांच्या भ्रष्टाचारामुळेच अफगाणिस्तानमध्ये दारिद्रय पसरले आहे, असेही इम्रान खान म्हणाले होते. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानमधील पूर्वीच्या सरकारांचाही ओझरता उल्लेख केला होता. त्याबद्दलही करझाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.