जम्मू – जम्मूतील पकिस्तान सीमेनजिक भारतीय हद्दीत एक शस्त्रसाठा पोलिसांना सापडला आहे. हा शस्त्रसाठा पाकिस्तानने भारतातील त्यांच्या हस्तकांसाठी टाकला असावा असा कयास आहे.
या शस्त्रास्त्र साठ्यांमध्ये एक एके रायफल, गोळ्यांचा साठा आणि एक टेलिस्कोप असे साहित्य आहे. प्रत्यक्ष सीमा रेषापासून भारतीय हद्दीत सहा किमी आत सौंजना गावात हा साठा सापडला आहे. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी या गावाला वेढा देऊन तेथे चौकशी सुरू केली आहे.
हा साठा कोणासाठी टाकला गेला होता व पाकिस्तानचे हस्तक म्हणून या गावात नेमके कोण काम करीत आहे याची माहिती आता घेतली जात आहे. भारतातील आपल्या हस्तकांना ड्रोनद्वारे शस्त्रे व मदत पाठवण्याचा प्रकार पाकिस्तानकडून गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. अलीकडच्या काळात त्यात मोठीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.