वॉशिंग्टन – अमेरिकेत विविध ठिकाणी महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमीत्त ट्विटरवर संदेश जारी करून अमेरिकेचे विदेश मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे की, महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सहिष्णुतेच्या संदेशाची आज कधी नव्हे इतकी मोठी गरज आहे.
गांधींचे विचार आणि त्यांचा आदर्श भारत, अमेरिका आणि साऱ्या जगातील आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादेत राहील असेही त्यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टन येथे गांधी स्मृतिस्थळ स्थापित करण्यात आले असून तेथे जाऊन अनेकांनी महात्माजींच्या स्मृतीला अभिवादन केले. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीतसिंग संधु यांनीही बापुंना तेथे आदरांजली अर्पित केली.
अमेरिकन कॉंग्रेसमन रो खन्ना यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहताना म्हटले आहे की, महात्माजींच्या तत्वांचे आणि त्यांनी दिलेल्या शांततेच्या संदेशाचे अनुकरण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यात एकदाही अमेरिकेला गेलेले नाहीत, पण या देशात गांधींना सर्वाधिक मान असून त्यांचे सर्वाधिक पुतळे आणि स्मारके अमेरिकेतच आहेत.
तेथील मार्टीन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखालील नागरी हक्कांची चळवळ महात्मा गांधी यांच्याच तत्वाने प्रभावित होती. अमेरिकेतील विविध पुतळ्यांना विविध संघटनांनी पुष्पांजली अर्पण करतानाच तेथे प्रार्थना सभाही घेतल्या. अमेरिकेतील भारतीय नागरीकांबरोबरच अमेरिकन नागरीकही या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.