Pakistan News: सध्या राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. रोखीच्या तुटवड्याचा सामना करणार्या पाकिस्तानशी संबंधित काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानने दोन चीनी बँकांकडून 600 दशलक्ष डॉलर्सचे नवीन कर्ज मागितले आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, IMF सोबत 3 अब्ज अमेरिकी डाॅलरच्या बेलआउट पॅकेजचा दुसरा टप्पा जाहीर करण्यासाठी पाकिस्तानने हे कर्ज मागितले आहे.
फेडरल सरकार इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC) आणि बँक ऑफ चायना यांच्याशी एकूण 600 दशलक्ष अमेरिकी डाॅलर कर्जासाठी बोलणी करत आहे, असे अहवालात म्हटले आहे. प्रत्येक बँकेला 300 दशलक्ष अमेरिकी डाॅलर किमतीच्या वित्तपुरवठ्यासाठी संपर्क साधण्यात आला होता.
अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बँकांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यापर्यंत कर्ज मिळेल, अशी अपेक्षा आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की, या कर्जाबाबत अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते कमर अब्बासी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. पाकिस्तानने चीनच्या स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्स्चेंज (SAFE) कडून आणखी कर्ज मागितले आहे का? या प्रश्नाचे उत्तरही अब्बासी यांनी दिले नाही. SAFE ने आधीच 4 अब्ज अमेरिकी डाॅलर कर्ज दिले आहे जे परतफेड करण्यास पाकिस्तानच्या अक्षमतेमुळे दरवर्षी पुनर्निर्धारित केले जाते.