इस्लामाबाद- पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याची मागणी करणारे सरकारी विधेयक पाकिस्तानी संसदीय समितीने मंजूर केले आहे. हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या शिक्षेचा फेरविचार करणे पाकिस्तानला बंधनकारक आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या विधेयकाच्या मसुद्यावरील अध्यादेशावर संसदेच्या विधी आणि न्याय विभागाच्या स्थायी समितीमध्ये बुधवारी चर्चा झाली. मात्र, या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध झाला.
कायद अणि न्याय मंत्री फरोग नसीम यांनी हे विधेयक समितीसमोर मांडले. आंतररष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणारे हे विधेयक जर संसदेने स्वीकारले नाही, तर पाकिस्तानवर निर्बंध घातले जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने 2017 साली फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यावर पाकिस्तानने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.