इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाक निवडणूक आयोगाने जामिनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. इम्रान यांच्याबरोबर त्यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्याविरोधातही अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्याविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या चार सदस्यीय पिठाने इम्रान खान यांच्यासह फवाद चौधरी आणि असाद उमर यांच्याविरोधात हे वॉरंट बजावले आहे.
गेल्या वर्षी “पीटीआय’च्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्याविरोधात वारंवार टीका केली होती. निवडणूक आयोगाने पक्षपाती धोरण रावून पाकिस्तान मुस्लिम लीगला अनुकूल निर्णय घेल्याची टीका या सर्वांनी केली होती. या प्रकरणी या सर्वांना गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नोटीस बजावण्यात आली होती.
या संदर्भात “पीटीआय’च्या नेत्यांना आपली बाजू मांडण्यासाठी आज अखेरची संधी देण्यात आली होती. आजच्या सुनावणीदरम्यान या आरोपांमधून वगळण्याची या नेत्यांनी केलेली मागणी फेटाळण्यात आली. या सर्वांविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर जामीनही मंजूर करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे.