Pakistan Election: पाकिस्तानमध्ये उद्या अर्थात 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांद्वारे पाकिस्तानातील जनता पुढील पाच वर्षांचे भविष्य ठरवणार आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. महागाईशी जनता होरपळत असताना देशात निवडणुका होत आहेत. यासोबतच येथील लोकांना अनेक आर्थिक आणि राजकीय संकटातही आपले जीवन जगावे लागत आहे. यातच आता उद्या पार पडणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानमध्ये किती जागांसाठी निवडणुका होणार आहेत?
पाकिस्तानमध्ये द्विसदनी संसदीय प्रणाली आहे ज्यामध्ये नॅशनल असेंब्लीचे बहुतेक सदस्य लोकांद्वारे निवडले जातात. नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागा आहेत, त्यापैकी 266 जागांसाठी लोक मतदान करतात. तर 60 जागा महिलांसाठी तर 10 जागा बिगर मुस्लिमांसाठी राखीव आहेत. पंजाब प्रांतात सर्वाधिक 141 जागा आहेत, सिंधमध्ये 75, खैबर पख्तूनख्वामध्ये 55, बलुचिस्तानमध्ये 20 आणि इस्लामाबादमध्ये तीन जागा आहेत.
किती मतदार आहेत?
पाकिस्तानमध्ये सध्या 12.85 कोटी मतदार आहेत, जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे. 6.9 कोटी पुरुष तर 5.9 कोटी महिला मतदार आहेत. नोंदणीकृत मतदारांपैकी 44 टक्के मतदार 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 2018 पासून, देशातील मतदारांची संख्या 2.25 कोटींनी वाढली आहे, त्यापैकी 1.25 कोटी महिला आहेत. 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 52 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सध्या पाकिस्तान निवडणुकीत 5,121 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी 4,806 पुरुष, 312 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत.
पाकिस्तानच्या निवडणुकीत कोणते पक्ष भाग घेत आहेत?
एकूण 5,121 उमेदवार 167 नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख पक्षांवर नजर टाकली तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) (पीएमएल-एन) आणि बिलावल भुट्टो आणि आसिफ अली झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी). इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. त्यामुळे पीटीआयचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
किती मतदान केंद्रांवर निवडणूक होणार आहे?
सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९० हजार ५८२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांमध्ये सुमारे 17,500 ‘अतिसंवेदनशील’ मतदान केंद्रे, सुमारे 32,508 संवेदनशील मतदान केंद्रे आणि सुमारे 42,500 सामान्य मतदान केंद्रांचा समावेश आहे. लोक बॅलेट पेपरद्वारे मतदान करतील.
महिलांसाठी किती जागा राखीव?
नॅशनल असेंब्लीच्या 70 सदस्यांची निवड विशेष पद्धतीने केली जाते. त्यापैकी 60 जागा महिलांसाठी आधीच राखीव आहेत. पारंपारिक आणि धार्मिक अल्पसंख्याक समुदायासाठी 10 जागा राखीव आहेत. मात्र, त्यांची निवडणूक प्रमाणिक प्रतिनिधित्व नियमानुसार होते. याचा अर्थ जो पक्ष जास्त जागा जिंकतो, त्या पक्षाचे सदस्य जास्त असतात. उदाहरणार्थ, एका पक्षाने 100 जागा जिंकल्या, तर दुसऱ्या पक्षाने 50 जागा जिंकल्या. अशा स्थितीत 100 जागा असलेल्या पक्षाच्या अधिक सदस्यांना उमेदवारी दिली जाते.
पहिल्यांदाच हिंदू महिलाही मैदानात
पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एका हिंदू महिलेनेही निवडणूक लढवली आहे. खैबर पख्तुनख्वाच्या बुनेर मतदारसंघातून पीपीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सवीरा प्रकाश या व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि सध्या त्या पीपीपी महिला शाखेच्या सरचिटणीस आहेत.