नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री आणि माजी खासदार लाल सिंह यांनी कॉंग्रेसमध्ये वापसी केली. त्यांनी डोग्रा स्वाभिमान संघटन पक्षही (डीएसएसपी) कॉंग्रेसमध्ये विलीन केला.
लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीर सज्ज झाले आहे. तिथे पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुकही होईल. अशात सिंह यांच्या स्वगृही परतण्याची घडामोड कॉंग्रेसला उभारी देणारी आहे. सिंह दोनवेळा उधमपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते.
यावेळी त्यांना त्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार जितेंद्र सिंह यांच्या विरोधात रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. खासदार बनण्याआधी ते जम्मू-काश्मीर विधानसभेवर निवडून गेले. कॉंग्रेस-पीडीपी सरकारमध्ये ते मंत्री बनले. त्यानंतर २०१४ यावर्षी लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आल्याने कॉंग्रेस सोडून ते भाजपवासी बनले.
भाजप-पीडीपी सरकारमध्ये ते मंत्रीही बनले. मात्र, कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या पाठिशी उभे राहिल्याच्या आरोपावरून ते वादात सापडले. त्यामुळे २०१८ मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. आता पक्ष विलीन करून ते जवळपास १० वर्षांनी कॉंग्रेसमध्ये परतले आहेत.