नवी दिल्ली – निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा सर्व तपशिल सादर करण्यात आला आहे, असे प्रतिज्ञापत्र आज स्टेट बँग ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, २१ मार्च २०२४ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ताब्यातील निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील भारतीय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत.
बाँड खरेदी करणाऱ्याचे नाव, त्याचे मूल्य आणि विशिष्ट क्रमांक, ज्या पक्षाने तो वटवला त्या पक्षाचे नाव, बाँडची पूर्तता करणाऱ्या राजकीय पक्षांच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक आणि रोख रकमेचा क्रमांक, ही माहिती या तपशीलातून देण्यात आली आहे. तसंच, खातेधारकांच्या सुरक्षेचा हवाला देत बँकेने राजकीय पक्ष आणि खरेदीदार या दोन्हींचे संपूर्ण बँक खाते क्रमांक आणि केवायसी तपशील उघड करणे टाळले आहे.
राजकीय पक्षांचे संपूर्ण बँक खाते क्रमांक आणि केवायसी तपशील सार्वजनिक केले जात नाहीत. कारण यामुळे खात्याच्या सुरक्षिततेशी (सायबर सुरक्षा) तडजोड होऊ शकते, असे खारा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, खरेदीदारांचे केवायसी तपशील सुरक्षेच्या कारणास्तव देखील सार्वजनिक केले जात नाहीत. अशी माहिती प्रणालीमध्ये भरलेली नाही, असे त्यात नमूद केले आहे.
एसबीआयने आता सर्व तपशील उघड केले आहेत. १५ फेब्रुवारी २०२४च्या आदेशानुसार कोणतेही तपशील जाहीर करण्यापासून रोखले गेले नाही, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एसबीआयने आज शेअर केलेले तपशील निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.