नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी पाकिस्तानने औपचारिकपणे आपला अर्ज दाखल केला आहे. २०२५ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी हे सदस्यत्व मिळावे, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेशी संबंधित सुरक्षा परिषदेच्या कार्यात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आपल्याला हे सदस्यत्व मिळावे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे कायम प्रतिनिधी राजदूत मुनीर अक्रम यांनी पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभामध्ये ही माहीती दिली.
पाकिस्तानला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहाय्य करावे, असे आवाहन देखील अक्रम यांनी केले आहे. सुरक्षा परिषदेच्या शांतता-सुरक्षेच्या कामात पाकिस्तान अर्थपूर्ण योगदान देऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ग्लोबल साऊथचे हित आणि सहकारी बहुस्तरियवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तान नेहमीच आग्रही आहे, असे सांगून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने दिलेल्या योगदानाची आठवण देखील अक्रम यांनी यावेळी करून दिली.