नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांवरून बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल करत आपल्याला व आपल्या पत्नीला धोका असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर पाकिस्तान सरकारने इम्रान आणि त्यांच्या पत्नीच्या सुरक्षेच्या संदर्भात उत्तर दिले आहे.
इम्रान यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाते आहे. तुरूंगातच त्यांच्या सुरक्षेवर दरमहा १२ लाख रूपये खर्च होत आहेत. त्यांच्यासाठी एकूण ७ सेल तयार करण्यात आल्या आहेत. आदियाला तुरूंगात असलेल्या इम्रान यांच्या खास संरक्षणासाठी १४ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
सामान्यत: दहा कैद्यांमागे एक सुरक्षा कर्मचारी असे या तुरूंगात प्रमाण असते मात्र १४ कर्मचारी केवळ इम्रान यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आले असल्याचे पाकिस्तान सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले.
दरम्यान, तोशाखाना प्रकरणात इम्रान व त्यांच्या पत्नी बुशरा यांना १४ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांच्या पत्नीला विष दिले गेले असल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वी त्यांनी केला होता. मात्र हा आरोप सरकारच्या वतीने फेटाळण्यात आला आहे व बुशरा यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनीही असे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.