नवी दिल्ली – पाकिस्तानच्या राजकारणामध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांच्या संख्येच्याबाबत भुट्टो कुटुंबाने शरीफ कुटुंबाला मागे टाकले आहे. माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या धाकट्या कन्या आसिफा भुट्टो या संसद सदस्या म्हणून आज बिनविरोध निवडून आल्या आहेत.
आसिफा याना संसद सदस्या होण्यापूर्वीच देशाच्या फर्स्ट लेडी म्हणून नियुक्त करण्याचे निश्चित झाले आहे. सिंध प्रांतातील शहिद बेनझीराबाद जिल्ह्यातील २०७ क्रमांकाच्या नवाबशाह मतदार संघातील पोटनिवडणुक पुढील महिन्यात होणार आहे. या पोटनिवडणुकीत आसिफा यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र आता त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आसिफा या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
आसिफा यांच्या या विजयामुळे राष्ट्रीय आणि प्रांतीय राजकारणात भुट्टो कुटुंबातील सदस्यांची संख्या ६ इतकी झाली आहे. बेनझीर यांचे पती आसिफ अली झरदारी हे देशाचे अध्यक्ष झाले आहेत. बिलावल भुट्टो हे पूर्वीच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. बिलावल भुट्टो आणि झरदारी यांचे मेव्हणे मुनवर अली तलपूर हे संसद सदस्य आहेत. तर फरयाल तलपूर आणि आझरा पेछुहो या झरदारी यांच्या दोन्ही मेव्हण्या सिंध प्रांताच्या विधीमंडळाच्या सदस्या आहेत.
दुसरीकडे शरीफ कुटुंबामध्ये शेहबाझ शरीफ हे पंतप्रधान आहेत. त्यांचे थोरले बंधू नवाझ शरीफ आणि त्यांचे पुत्र हमजा शेहबाझ हे संसद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. तर नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ शरीफ या पंजाबच्या मुख्यमंत्री आहेत.