नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंजाब प्रांताच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता शरीफ यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री आणि शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांच्या समवेत त्यांनी ही बैठक घेतली आहे.
शरीफ हे पाकिस्तानातील सत्तारुढ पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज गटाचे सर्वेसर्वा आहेत. पंजाब प्रांतातील कृषी विषयक मुद्यांचा आढावा घेण्यासाठी नवाज शरीफ यांच्या सह-अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, असे पाकिस्तानातून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
नवाज शरीफ यांच्याकडे सध्या राष्ट्रीय अथवा प्रांतीय पातळीवरील कोणतेही सरकारी पद नाही. ते केवळ संसदेचे सदस्य आहेत. असे असताना पंजाब प्रांताच्या सरकारी अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेण्यावर टीका व्हायला लागली आहे.
मार्च महिन्यात शरीफ यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असल्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांच्या ३ बैठका घेतल्या होत्या. त्यांनी विविध प्रकल्पांबाबत मंत्र्यांना सूचनाही केल्या होत्या. पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी शरीफ हे पंजाब प्रांताचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले होते.