पुणे – जळगाव, औरंगाबाद आणि उस्मानाबाद संघांनी राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेतील आपला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. औरंगाबाद संघाने आपला धडाका कायम राखताना धुळे संघावर 6-2 असा विजय मिळविला. यात मोहित काथोटे याने दोन गोल नोंदवले.
राज पवारने दुसऱ्या, हर्ष काथोटेने तिसऱ्या आणि मोहितने पाचव्या मिनिटाला गोल केला. मोहितने त्यांनी पंधराव्या मिनिटाला गोल करून मध्यंतरालाच औरंगाबादने 4-0 अशी आघाडी घेतली.
ओम चांगले याने 43, आकाश जमदाडेने 48 व्या मिनिटाला गोल करून आघाडी 6-0 अशी वाढवली. पण, अखेरच्या मिनिटांत त्यांनी दोन मिनिटात दोन गोल स्वीकारले. उस्मानाबाद संघाने सोलापूरचा 10-3 असा पराभव केला.
झिशान शेखने 7 आणि 40, स्वप्निल गरसुंडने 9, 39, अईफाज सय्यदने 12 आणि 57व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात आपला प्रमुख वाटा उचलला. अखेरच्या सामन्यात जळगावने सांगलीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये 3-2 असा विजय मिळविला.