पुणे : पु. ल. देशपांडे यांचा 12 जून हा स्मृतिदिन आहे. यानिमित्त “कोहिनूर पु. ल. स्मृती महोत्सव’ दि.11 आणि 12 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. मोफत असलेल्या महोत्सवात रसिकांना सांस्कृतिक पर्वणी मिळणार आहे, अशी माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी दिली आहे.
स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाच्या प्रवेशिका दि. 10 जून रोजी स.प. महाविद्यालयाच्या मुख्य दारापाशी सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत उपलब्ध असतील.
दि. 11 रोजीचे कार्य्रकम
ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी “पुलंचे संचित’ या विषयावर त्या विचार मांडणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (अर्काइव्ह) माजी संचालक प्रकाश मगदूम यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पु. ल. आणि सुनीताबाई यांच्यावर “अनुभव’ मासिकात आलेल्या “तप:स्वाध्याय’ या ललित निबंधावर आधारित अभिवाचनाचा “प्रिय भाई..एक कविता हवी होती’ हा रंगमंचीय अविष्कार सादर होणार आहे. कार्यक्रमाचे दिग्दर्शन अमित वझे यांनी केले असून, लेखन आणि रंगावृत्ती डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांची, तर चित्रे मिलिंद मुळीक यांची आहेत. हा कार्यक्रम जयदीप वैद्य, अपर्णा केळकर, निनाद सोलापूरकर, अमित वझे आणि मुक्ता बर्वे सादर करणार आहेत.
दि. 12 रोजीचे कार्य्रकम
यावेळी “द्रष्टे पु. ल.’ हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये डॉ. मंदार परांजपे, प्रकाश मगदूम, प्रवीण तरडे, डॉ. आशुतोष जावडेकर आणि डॉ. रामचंद्र देखणे सहभागी होणार असून, प्रा. मिलिंद जोशी हे सूत्रसंचालन करणार आहेत. यावेळी सुधीर मोघे आणि मुक्ता राजाध्यक्ष दिग्दर्शित “या सम हा’ हा दुर्मिळ लघुपट दाखवण्यात येईल.