पुणे, दि. 8 – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींचा जागर आता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात होणार आहे. “आशय सांस्कृतिक’तर्फे पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने आयोजित करण्यात येणारा “पुलोत्सव’ आता “ग्लोबल’ स्वरूपात होणार आहे. येत्या वर्षभर हा “ग्लोबल पुलोत्सव’या नावाने साजरा होणार असून, याअंतर्गत देशातील 23 शहरांसह जगातील पाच खंडातील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रम रंगणार आहेत.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि “ग्लोबल पुलोत्सवा’चे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी “पुलं’च्या जन्मदिनानिमित्त पत्रकार परिषदेत या महोत्सवाची रुपरेषा सांगितली. यावेळी महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सहसंयोजक सुवर्णा भांबुरकर आणि नयनीश देशपांडे उपस्थित होते.
आठ नोव्हेंबर 2022 ते आठ नोव्हेंबर 2023 या कालावधीत हा “ग्लोबल पुलोत्सव’ जगभरात साजरा होणार आहे. राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर या शहरांसह देशातील इंदोर, बडोदा, बंगळुरू, हैद्राबाद, दिल्ली, अहमदाबाद आदी शहरांमध्येही कार्यक्रम होणार आहेत. तसेच, जगभरातील लंडन, म्युनिच, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, कतार, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरन्टो, जोहान्सबर्ग, सिडनी, ऑकलंड आदी शहरांमध्येही वर्षभर महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक शहरात मान्यवरांची “सल्लागार समिती’ तर पु. ल. प्रेमी आणि संस्थांची “कार्य समिती’ तयार करण्यात येणार असल्याचे चित्राव यांनी सांगितले.
असा होणार महोत्सव
विविधरंगी कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकारांना संधी
सुमारे एक हजार कलाकार आणि साहित्यिक होणार सहभागी
प्रत्येक शहरातील पुलोत्सवात “स्मृती सन्मान’, “जीवनगौरव सन्मान’, “कृतज्ञता सन्मान’ आणि “तरुणाई सन्मान’ गुणवंतांना दिले जाणार
महोत्सवाच्या निमित्ताने पुलंवरील दर्जेदार पुस्तक
आणि लघुपटांची निर्मिती
महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पुलंच्या साहित्यावर आधारलेल्या
अर्कचित्रांचे प्रदर्शन
“आय लव्ह पी. एल.’ या शीर्षकाखाली शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष मोहीम राबवणार