ऑक्सिजन टँकर्सची रेल्वेने वाहतूक ते रिकाम्या टँकर्सना एअर लिफ्ट – पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

नवी दिल्ली –  देशात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. देशात दररोज २ लाखांहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण सापडत असून यामुळे अनेक ठिकाणची आरोग्यव्यवस्था मेटाकुटीस आली आहे. यातच करोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे प्राणवायूची मागणीही वाढली आहे. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. याच पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलवली होती.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी यावेळी राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा जलदगतीने करण्यात यावा असे सांगितले. बैठकीमध्ये ऑक्सिजन टँकर्सच्या वाहतुकीसाठी विनाथांबा रेल्वेगाड्यांच्या वापराबाबत चर्चा झाली. तसेच ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करणारी पहिली रेल्वे गाडी १०५ मेट्रिक टन प्राणवायूसह मुंबईहून विशाखापट्टणमला पोचली अशी माहिती देण्यात आली. वेळेची बचत व्हावी यासाठी रिकामे ऑक्सिजन टँकर्स हवाई मार्गाने पुरवठादारापर्यंत पोचवण्यात येत आहेत असंही सांगण्यात आलं.

यावेळी, गेल्या काही दिवसांमध्ये देशातील ऑक्सिजनची उपलब्धता ३३०० मेट्रिक टनने वाढली असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं. ऑक्सिजनची वाढलेली उपलब्धता सरकारी व खासगी स्टील कंपन्या, ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्या व अत्यावश्यक सेवा वगळून इतरांवर ऑक्सिजनवापरास घालण्यात आलेली बंदी यांमुळे शक्य झाल्याचं नमूद करण्यात आलं.

राज्यांनी अतिरिक्त ऑक्सिजनची साठेबाजी करू नये असे निर्देशही पंतप्रधानांनी यावेळी दिले. बैठकीला उपस्थित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पुरवठा करण्यात आलेल्या ऑक्सिजनचे ऑडिट करण्यात आल्यास चालू उपचारांवर कोणताही विपरीत परिणाम न होता मागणी नियंत्रित ठेवण्यात मदत होते असं सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.