येरवडा कारागृहात दाखल करून घेण्यास प्रशासनाचा नकार
– विशाल धुमाळ
दौंड- दौंड उपकारागृहात असणारे आरोपी येरवडा कारागृहात दाखल करून घेण्यास येरवडा कारागृह प्रशासन तयार नसल्याने मर्यादा नसतानाही जास्तीचे आरोपी दौंड उपकारागृहात ठेवावे लागत आहेत. दौंड वगळता इतर ठिकाणी असणाऱ्या आरोपींना मात्र येरवडा कारागृहात लगेच जागा मिळते, ही जागा दौंडच्या उपकारागृहामधून जाणाऱ्या आरोपींसाठी का मिळत नाही, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
दौंडला उपकारागृहाचा दर्जा देण्यात आलेला आहे. या उपकारागृहाच्या दर्जाचे कारण देत या ठिकाणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपींना येरवडा कारागृहात पाठवले असता, त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत आरोपींना दाखल करून न घेता, परत पाठवले जात असल्याचे मागील पाच-सहा महिन्यांत समोर आले आहे.
- क्षमतेपेक्षा दुप्पट आरोपी
वास्तविक दौंड उपकारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीतील आरोपींना ठेवण्यासाठी आठ जणांची मर्यादा आहे. मात्र आजच्या तारखेला या उपकारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत पंधरा आरोपी आहेत, त्यामुळे जवळपास दुप्पट आरोपी सध्या या उपकारागृहात आहेत. - आरोपींवर वैद्यकीय उपचार करायचे कुठे
या उपकारागृहामधील आरोपींसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीत. एखाद्या आरोपीला कोणताही आजार झाल्यास त्याच परिसरात दवाखाना असणे गरजेचे आहे. मात्र शासकीय दवाखाना येथून दोन-अडीच किलोमीटर अंतरावर बाहेर असल्यामुळे आरोपींवर उपचार करणे कठीण होत आहे. सध्या एका आरोपीस डेंग्यूसदृश आजार झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, त्याच्यावर उपचार कुठे करायचे, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. येरवडा कारागृहासाठी रुग्णालयाची सोय आहे त्यामुळे तेथील आरोपींना काही झाल्यास त्याच ठिकाणी तात्काळ उपचार केले जातात. मात्र, अशी कोणत्याही प्रकारची सुविधा येथे नाही, त्यामुळे पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान निर्माण झालेला आहे की आरोपींचा उपचार करायचा तरी कसा ? - महिला आरोपींना दाखल केले जाते
उपकारागृहावरून येरवडा कारागृहात पाठवलेल्या महिला आरोपींना येरवडा कारागृह प्रशासन दाखल करून घेत आहे. मात्र गंभीर गुन्ह्यातील आरोपींनासुध्दा दाखल करून घेत नाहीत. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना तरी निदान प्रशासनाने कारागृहात दाखल करून घ्यावे, अशी अपेक्षा येरवडा कारागृहात सोडण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी व्यक्त करीत आहे. - दौंड उपकारागृहात क्षमतेपेक्षा जास्त आरोपी आहेत, ही बाब खरी आहे. हे न्यायालयीन कोठडीतील आरोपी आहेत. यासंदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक, जिल्हा अधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे. तसा पत्रव्यवहार येरवडा कारागृहातही आमच्या वरिष्ठांना केला असून, येरवडा कारागृहाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने किंबहुना आरोपी दाखल करून घेत नसल्याने नाईलाजास्तव न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपींना याच ठिकाणी ठेवावे लागत आहे.
– सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, दौंड