पुणे विभागात 25 हजार बाधित : 9 हजार 19 ऍक्टिव्ह रुग्ण
पुणे – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत करोनाबाधितांची संख्या 25 हजार 127 इतकी झाली आहे. यातील 15 हजार 95 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ऍक्टिव्ह रुग्ण 9 हजार 19 आहेत.
विभागात करोनाबाधित एकूण 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 356 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 58.04 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के इतके आहे. विभागात एकूण 1 लाख 67 हजार 400 नमूने तपासणीसाठी पाठवले होते.
त्यापैकी 1 लाख 64 हजार 561 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, 2 हजार 839 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 39 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.