निगडी, (वार्ताहर) – ताम्हाणे वस्तीतील राजा शिवछत्रपती सोसायटीत काही महिन्यांपासून ड्रेनेजलाइन तुंबल्याने मैलामिश्रित दूषित पाणी रस्त्यातून वाहत आहे. याबाबत स्थानिक नागरिक व माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे यांनी महापालिकेच्या संबंधित विभाग व अधिकार्यांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.
त्यामुळे सोसायटीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्ती करून देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे व नागरिकांकडून होत आहे.
राजा शिवछत्रपती सोसायटीत मागील पाच महिन्यांपासून ड्रेनेजलाइनची समस्या आहे. महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या ड्रेनेजविभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनदेखील अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लहान मुले रस्त्यावर दूषित पाण्यात खेळत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु महापालिकेचे दामू तापकीर व अभिजित गणबोटे यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील कर्मचारी उपाययोजना करत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
अधिकार्यांची उडावाउडवीची उत्तरे
महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना येथील तक्रारीबाबत सांगितले असता आज करू, चार दिवसांत काम करतो असे सांगून वेळ मारून नेहेत आहेत. असे चार ते पाच महिने झाले येथील नागरिक त्रास सहन करत आहेत. दूषित पाणी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्त करून द्यावी.
सोसायटीत मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास आहेत. ड्रेनेजलाइन तुंबली तरी लवकर कर्मचारी येत नाहीत. दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही अधिकारी दखल घेत नाहीत. जर अधिकार्यांनी दोन दिवसांत काम सुरू केले नाही तर स्थानिक नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढून संबंधित अधिकार्यांच्या केबिनमध्ये दूषित पाणी टाकण्यात येईल. – शरद ताम्हाणे, सामाजिक कार्यकर्ते.