खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिका हद्दीतील लव्हेज या गावातील सर्वे नंबर दोनमधील तीन मजली इमारत अचानक जागेवरच कोसळल्याने परिसरातील नागरिकात घबराट पसरली. सदरची घटना मंगळवारी पहाटे तीनच्या दरम्यान घडली.
प्रचंड आवाज, धुळीचे लोट यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अपघातग्रस्त मदत टीमचे सदस्य, अग्निशामक दलाचे जवान, तसेच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इमारत अनेक वर्षापासून बंद असल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
मौजे लव्हेज येथील सर्वे नंबर 2 मध्ये जागामालक अशोक भारती यांनी चेंबूरचे विकसक गणेश माने यांना जागा विकसनासाठी दिली होती. ही इमारत 2010 च्या दरम्यान तयार झाली. दरम्यान इमारत बांधकामावरून जागा मालक व विकसक यांच्यात शीत युद्ध सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे. तर, या इमारतीचे बांधकाम सदोष असल्याचे जागामालक भारती यांनी नगरपरिषद प्रशासनाला माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर सर्वच इमारत धोकादायक असल्याचे पत्र 4 एप्रिल 2024 ला मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी जागामालक व विकसन यांना दिले व त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे लेखी पत्र दिल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. मात्र, जागामालक व विकासाक यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळ अखेर इमारत मंगळवारी पहाटे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेजारी इमारतीचे सुरक्षा कंपाउंड तुटल्याचे दिसून आले.
दरम्यान, तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या घटनेबाबत दूरध्वनीवरून माहिती घेतली. तर, मुख्याधिकारी पंकज पाटील, बांधकाम अभियंता वाणी यांनीही घटनास्थळी भेट दिली. दुर्घटना झाल्यानंतर तातडीने सहायक पोलीस निरीक्षक गडदे, पोलीस उपनिरीक्षक व्हरंबले यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.
महावितरण विभागाने पडलेल्या खांबावरील जिवंत विद्युत वाहिनीचे कनेक्शन बाजूला करून विद्युत पुरवठा सुरू केला. नगर पालिका प्रशासनाने इमारती शेजारील रस्त्यावर पडलेला मातीचा ढिगारा तातडीने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे.या संदर्भात नगरपरिषद या घटनेबाबत चौकशी करीत असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार. – डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक.