सातारा (प्रतिनिधी) – सातारा वाढीव एमआयडीसीच्या टप्पा क्र. 3 व 4 साठी देगाव, निगडी आणि वर्णे येथील शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला तर ते जमिनी देण्यास तयार होतील. रोजगारनिर्मिती, भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी वाढीव एमआयडीसी होणे गरजेचे आहे. येथे हेक्टरी 11 लाख रुपये एवढा कमाल दर आहे. नवीन कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट, म्हणजे हेक्टरी 44 लाख रुपये दर मिळू शकतो; परंतु शेतकऱ्यांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
सातारा वाढीव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 3, देगाव आणि टप्पा क्र. 4 निगडी व वर्णे येथील भूसंपादनाबाबत तातडीने बैठक घेण्याची मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली होती. या मागणीनुसार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 23) दुपारी झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रराजे यांनी भूसंपादन व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराबाबत सविस्तर चर्चा केली. माजी आमदार प्रभाकर घार्गे, औद्योगिक विकास महामंडळाचे कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, साताऱ्याचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, भूमापक खापरे व अधिकारी उपस्थित होते.
देगाव, निगडी, वर्णे येथे वाढीव एमआयडीसी मंजूर असून तसे शिक्केही जमिनीवर पडले आहेत. रोजगारनिर्मितीसाठी ही एमआयडीसी लवकर सुरू होणे आवश्यक आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील आणि शेतकऱ्यांच्या जमिनीला पैसेही मिळतील. त्यासाठी भूसंपादन तातडीने झाले पाहिजे. रास्त भाव मिळाल्यास शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत. भूसंपादन करताना बागायती क्षेत्र, घरबांधणीसाठी झालेले प्लॉटिंग, नागरी वस्त्या व देगावचा पाझर तलाव वगळून डोंगरालगतची पडीक, माळरान जमीन संपादन करावी, अशी सूचना आ. शिवेंद्रराजे यांनी केली.
शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी स्वत: पाठपुरावा करू. शेतकऱ्यांनीही भूसंपादनासाठी सहकार्य केले पाहिजे. चांगला दर मिळत असेल तर विरोध करू नये. आपल्याच मुलाबाळांना हक्काच्या नोकऱ्या मिळण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याबाबत सिंह यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.