नवी दिल्ली – देशातील खासगी रुग्णालयांना मे महिन्यात करोना लसींचे जे 1 कोटी 29 लाख डोस मिळाले होते त्यापैकी त्यांनी केवळ 22 लाखच डोस वापरले आहेत. बाकीचे डोस त्यांच्याकडेच पडून राहिले आहेत, अशी माहिती सरकारकडूनच उपलब्ध झाली आहे.
दरवेळी राज्यांकडे कोटी-दीड कोटी डोसपेक्षा अधिक डोस पडून असल्याची जी माहिती दिली जात होती, त्याचाही उलगडा यानिमित्ताने झाले आहे. हे डोस मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांमध्येच पडून होते असे यातून आता स्पष्ट झाले आहे.
मे महिन्यात सरकारकडून एकूण 7 कोटी 40 लाख डोस उपलब्ध करून देण्यात आले होते त्यापैकी 1 कोटी 85 लाख डोस खासगी रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यातील 1 कोटी 29 लाख डोस रुग्णालयांनी प्रत्यक्ष उचलले. पण त्यातील केवळ 22 लाख डोसचाच त्यांनी वापर केला आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये या लसींसाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात असल्याने सामान्य लोकांनी तेथील उपलब्धतेकडे पाठच फिरवली त्यामुळे ही स्थिती उद्भवली असावी असे संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या खासगी रुग्णालयात कोविशिल्डचा डोस 780 रुपयांना, स्पुटनिकचा डोस 1145 रुपयांना आणि कोव्हॅक्सिनचा डोस 1410 रुपयांना उपलब्ध आहे.
त्यात रुग्णालयांना मंजूर करण्यात आलेल्या 150 रुपयांच्या सेवा शुल्काचाही समावेश आहे. तथापि, सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध असताना खासगी रुग्णालयांमध्ये इतके पैसे मोजून ही लस खरेदी करण्यास सामान्य नागरिकांची मात्र तयारी नसते. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील ही लस पडून राहिली असावी, असे सांगण्यात येत आहे.