सोलापूर – सोलापूरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका डान्सबारवर छापा टाकला आहे. सोलापूर शहरातील हॉटेल पॅराडाईज येथे अश्लील नृत्य सुरू असून काही जण चलनी नोटांची उधळण करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल पॅराडाईजवर छापा टाकला. यावेळी स्टेजवर 8 नृत्यांगना अर्धनग्न अवस्थेत अश्लील हावभाव करत बीभत्स डान्स करत होत्या. तर काहीजण हे त्यांच्यावर चलनी नोटांची उधळण करत होते.
सोलापूर शहरात करोनाची स्थितीनुसार मनोरंजन कार्यक्रमास केवळ 50 टक्के मर्यादेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेल पॅराडाईज येथे क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिल्याने करोनाच्या नियमांचे देखील उल्लंघन होत होते.
तसेच ऑर्केस्ट्रा बारमधील ग्राहकांना विनापरवाना मद्य पुरवल्याचे देखील पोलिसांच्या लक्षात आले.
हॉटेलचा मालक बाबा जाफर हा त्याचा हस्तक संजय पोळ आणि मॅनेजर मुकेशसिंग बायस यांच्यामार्फत हॉटेल पॅराडाईज चालवत होता. त्यामुळे यांच्यासह एकूण 29 इसम आणि 8 नृत्यांगना याना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणी तब्बल 48 लाख 98 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.