#आपलं_डेक्कन !!

आज सकाळी १० वा. च्या सुमारांस घरचा किराणा-भाजीपाला खरेदी केल्यावर सहज मनांत विचार आला.बाहेर पडलोंच आहोत तरं जास्ती नाही पण १०-१५ मिनीटं का-होईना आपल्या डेक्कनला एक फेरफटका मारूनंच घरी जाऊ..फेरफटका मारला तर प्रचंड शांत, बंद आणि ठप्प ‘डेक्कन’ पाहिला मिळालं…जगाच्या नकाशावर शंकरपाळी सारख्या दिसनाऱ्या भारतात तीळभर डेक्कनमधील माझी आजची सकाळ वेगळीच गेली..

• सर्व ठिकाणं जरी बंद झाली असली तरी आपले ‘संभाजी राजे’ भर चौकात तलवार घेऊन उभे आहेत.
तसेच.. संचारबंदीचे पालन करणाऱ्या रयतेकडे धर्मवीर संभाजी महाराज अभिमानाने पाहत होेते.

• सावरकर स्मारकातील विनायकांपासून ते झाशीच्या रानीच्या पुतळ्यापर्यंत सगळेच अचंबित होते. शिक्षणाचे धडे देणारी बालशिक्षण शाळा, गरवारे शाळा विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहत होती.  एरवी खरेदीसाठी गजबजलेल्या गर्दीत दिसणारी हाँग-काँग लेन, आज मात्र पूर्ण शांत दिसली. PYC हिंदू जिमखाना, डेक्कन ग्राउंड हि मैदानं तिथं खेळायला येणाऱ्या माणसांची खूप आतुरतेने वाट बघत होती.

• अनेक गणपती मंडळाचे मंदीरांमधील ‘गणपती बाप्पा’ बंद दारं-खिडक्यातुन सहज डोकावत होते. हार-तुऱ्यांच्या ओझ्यावाचून ते ही काहीसे निवांत होते.मोकळा गाभारा कदाचित सुसह्य वाटत असावा त्यांना..

• खंडुजीबाबा मंदिर, पांचाळेश्वर मंदिर, बलभीम मंदिर, ही मंदिरं आत्ताच्या अभूतपूर्व शांततेत दुरूनंच एकमेकांच्या गप्पांमध्ये रंगलेले दिसले. चितळे बंधू, काका हलवाई ह्या मिठाईच्या दुकानांच्या बंद कुलुपावरही आता धूळ जमली होती. ‘इथे गोडाचं संपलं’ असं वाटल्यामुळे मुंग्यांनीही आपली वाट बदलली होती..होळी सुटली.. पण गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया मात्र पुरते अडकले.

• बालगंधर्व रंगभूमीत किण-किनणांरी सुरेल घंटा, श्रवणीय नांदीचे सूर हे आजच्या शांतनेने नाटकाच्या पडद्या प्रमाणे दूर झाले होते.

• पुस्तकं-वह्यांच्या गठ्ठयामागे लपलेली ‘उत्कर्ष बुक डेपोची’ पाटी आज हसून बघंत होती.

• R-Deccan मॉल (सिटी प्राईड) आज फक्त काचेची इमारत होती. सिनेमाचं पोस्टर सोडलं तर बाकी सर्व निर्जीव वास्तू होती. लकडीपूल, झेड ब्रिज हे नदी काठी आप-आपले अंग पसरून जणू काही झोपलेले होते.  सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे करणारी आपली पुलाची वाडी आज मात्र टाळे बंद आहे. डेक्कन चौपाटी.. नदी पात्राकडे एकटक शांत बघत होती. बिपिनचा खिचडीचा स्टाॅल, अनिल भेळची हातगाडी अनेक खवैयांची वाट पाहत उभी आहे.

• एरवी सदैव हसणारा mcdonald’s दुकानाच्या बाहेरील पुतळ्यातला तो माणूस आजची शांत परिस्थिती पाहून हतबल वाटत होता.

• गुडलक चौक हा निव्वळ नावा पुरतां चौक होता.  आजु-बाजुला इतर वेळे सारखा कसलांच कांगा-रोळा आज नव्हता.

• संतोष बेकरीचं पॅटिस, वाडेश्वरचं थालीपीठ, वैशालीचा डोसा तर लांबच.. तंबीचा एक वडापाव मिळायचा खोळंबा होता.

•तरुणाईने ओथंबलेला एफ.सी रस्ता सुना-सुना झाला होता. कमला नेहरू उद्यान, संभाजी महाराज उद्यान. हि उद्यानं तेथे येणाऱ्या नागरिकांन सोबत एकत्र जमून भेळ खाण्यासाठी वाट पहाताना दिसत होती.  लाखो वाहनांना रोज पाठीवर वाहणारे आपल्या डेक्कन मधील J.M. रोड, F.C. रोड भयान शांततेत नाहून निघाले आहेत.संबंध पुणेकरांच्या वाहनांच्या पायघड्या पडण्याची जणू ते रस्ते वाटचं पाहत आहेत.

• हजारो पुणेकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक अचुक वेळेत वाहणाऱ्या डेक्कन जिमखाना पी.एम.टी बस स्थानकाच्या आगारात वेगळीचं शांतता पसरली होती.

• B.M.C.C कॉलेज, M.M कॉलेज, F.C कॉलेज ह्या महाविद्यालयाच्या वास्तूची अवस्था काही वेगळी नव्हती. एरवी विद्यार्थ्यांनी गजबजलेली हि महाविद्यालय आज पूर्ण शांत होती..

• पिवळे हेल्मेटवीर, मोठमोठाल्या क्रेन यांच्याशिवाय मेट्रोचे कामही ठप्प झाले होते.
अर्धवट बांधकामाखाली सावलीला आज चिटपाखरुही नव्हते.कधी सुरु होणार मेट्रो ? हा प्रश्न परत “बटाट्याच्या चाळीसारखा” भिजत पडला होता.

• या सगळ्या शांततेत सह्याद्री हॉस्पिटल, प्रयाग हॉस्पिटल आणि इतर वैद्यकीय सेवा अविरतपणे चालू होत्या. खाकीतला देव माणूस.. म्हनजेच आपले ‘पोलीस‘ डेक्कनच्या मुख्य अश्या खंडुजीबाबा चौकात व इतर चौकात त्यांचे काम चोख बजावत होते…

• स्वच्छता कर्मचारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातील कर्मचारी काळजी पुर्वक सर्वांसोबत नेटाने किल्ला लढवताना पाहिला मिळाले.

पुण्याची सांस्कृतिक राजधानी पालथी घालून मी ही शेवटी घरी परतलो. न दिसणाऱ्या विषाणूची लीला पाहून थक्क झालो.. सुसह्य असली तरी अशी सकाळ मला कदापिही भविष्यात नको… जगाची विस्कटलेली घडी नीट बसून सर्व काही आलबेल व्हावं हीचं मंगलमूर्ती गणरायांस प्रार्थना !!

- अक्षय तुकाराम साळुंके डेक्कन, पुणे

 

 

 

 

 

 

 

– अक्षय तुकाराम साळुंके , डेक्कन, पुणे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.