मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी आता एसटी महामंडळ सरसावले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटीशीत म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी उच्चस्तरीय समितीसमोर आपल्या संघटनेची बाजू आज मांडली. राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या या बैठकीतही संपाबाबत तोडगा निघाला नाही.
दरम्यान, एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. काल संध्याकाळी सहापर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.
सध्या एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या 7 हजार 400 आहे. यामध्ये प्रशासकीय 5224 कर्मचारी, 1773 कार्यशाळा कर्मचारी, 264 चालक आणि 139 वाहक आहेत. प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84,866 आहे.