नवी दिल्ली – नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न एका जोडप्याने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. या जोडप्याने दारुच्या नशेत राष्ट्रपती भवानामधील प्रेसिडंट इस्टेटच्या गेटला वाहनाने धडक देत राष्ट्रपती भवानाच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या जोडप्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. एक गाडी गेटला धडक देऊन राष्ट्रपती भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून तिथे तैनात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने या जोडप्यावर कारवाई करत ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेही वयाच्या विशीतील आहेत. दोघांनी हुंडाई आय-20 गाडीच्या मदतीने राष्ट्रपती भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरक्षेला धोका पोहचवणे, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणे आणि मोटर अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी या जोडप्याविरोधात एफआयआर दाखल केला. या घटनेसंदर्भात सोमवारी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी पोलीस स्थानकामध्ये माहिती मिळाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या जोडप्याने गाडीने काही बॅरीकेट्सला धडक दिली आणि गेटमधून ते राष्ट्रपती भवनाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.