मुंबई: मुंबईतील आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध दर्शविला आहे. गुजरातमध्ये आयएफएससी स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
आयएफएससी सेंटर मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पतही घसरेल, असा इशारा यावेळी शरद पवार यांनी दिला.
आयएफएससी प्राधिकरण ही देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी युनिफाइड एजन्सी आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक भांडवल यादृष्टीनेही आयएफएससीला स्थानांतरित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आणि स्थान आहे, असेही शरद पवार म्हणाले. गुजरात येथे आयएफएससी प्राधिकरण नेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
मुंबईच्या ऐवजी गांधीनगर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण स्थापन करण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध करून शरद पवार यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. सर्व व्यापारी समुदाय, बॅंकर्स आणि इतर वित्तीय संस्था यांची सर्वसाधारण मानसिकता लक्षात घेता मुंबईत एकीकृत प्राधिकरण स्थापित करणे ही स्वाभाविक निवड ठरेल.
मात्र या उपरोक्त निर्णयामुळे देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराच्या असलेल्या मोक्याच्या स्थानाला व महत्त्वाला धक्का देण्याची भूमिका घेतली गेली आहे. जगभरातील अनेक वित्तीय संस्थासुद्धा या धक्कादायक निर्णयामुळे मागे हटतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान माझ्या या पत्रातील भूमिका व भावना समजून घेतली जाईल व आयएफएससी प्राधिकरणाची स्थापना मुंबईत करण्याचा विचार कराल, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.