…अन्यथा रास्ता रोको करू

पिंपळे जगताप ग्रामस्थ आक्रमक : अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था

केंदूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत भारत पेट्रोलियम गॅस कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

गेल्या 15 वर्षांपासून चाकणरोड ते भारत गॅस कंपनीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने आणि भारत गॅस कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता येथील ग्रामस्थांना वापरण्यासाठी अतिशय धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्याचा वापर सणसवाडी आणि कोरेगाव भीमा परिसरातील कारखान्यात रोजगारासाठी जाणारे करंदी, जातेगाव, केंदूर परिसरातील कामगार करीत आहेत; परंतु या रस्त्याला मोठे खड्डे पडून खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर अनेकवेळा अपघातही घडले आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा गॅसच्या टाक्‍या भरून उभे असलेले ट्रक त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पिंपळे जगताप ग्रामपंचायतने अनेकवेळा गॅस कंपनीकडे उर्वरीत एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे; परंतु कंपनी प्रशासन कोणतेही सहकार्य करायला तयार नसल्याने पर्यायाने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. रस्ता रोको दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास सर्वस्वी कंपनी प्रशासन त्यास जबाबदार राहील, अशा संबंधीचे पत्र थेट मुख्यमंत्री, पुणे पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि शिक्रापूर पोलिस ठाण्याला दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.