आमदार भरणे समर्थकांची घालमेल

इंदापूर तालुक्‍यात पवार-पाटील कुटुंबीयांचा सलोखा


आघाडी धर्मामुळे आगामी विधानसभेला नुरा कुस्तीची शक्‍यता

– सचिन खोत

पुणे – पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय दुरावा, संघर्ष अवघ्या जिल्ह्याला परिचित आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांत पाटील यांना शह देणाऱ्या पवार यांनी गेल्या साडेतीन वर्षांत जवळीकता आणि सलोखा वाढविला आहे. इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादीला उर्जितावस्था आणणाऱ्या माजी मंत्री अजित पवार यांनी बस्तान बसविले. त्यातून तालुक्‍यात घड्याळाची टिकटिक वाढली. पाच वर्षांतील संघर्ष इंदापूर तालुक्‍याने पाहिला. मात्र, 2019 मधील लोकसभा निवडणुकीत संघर्षाची जागा सलोख्याने घेतली. त्यानंतर पवार आणि पाटील यांच्या कुटुंबीयातील सलोखा हा जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. संषर्घाची किनार असलेल्या पवार आणि पाटील कुटुंबीयातील खासदार सुळे आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या दिल्ली भेटीतून हा सलोखा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे समर्थकाच्या जिवाची चांगलीच घालमेल सुरू झाली आहे.

यंदाच्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यातील लढत गाजली होती. तीन मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद असल्यामुळे शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या विजयी मार्गातील अडथळे दूर केले होते. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यात माजी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीला 70 हजारांचे मताधिक्‍य दिले होते.

बारामती मतदारसंघात इंदापूर, भोर, पुरंदर तालुक्‍यात कॉंग्रेस प्रबळ आहे. त्यामुळे बारामतीच्या निकालावर परिणाम करणाऱ्या या तीन तालुक्‍यांत कॉंग्रेसची मोट बांधून सुळे यांना मताधिक्‍य देण्यात यशस्वी झाली. याचे श्रेय हर्षवर्धन पाटील यांना जात आहे. दीड महिन्यांपूर्वी शरद पवार हे इंदापूरच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आले होते. पाटील व आमदार दत्तात्रय भरणे हे एकाच गाडीतून प्रवास करीत होते. त्यावेळेपासून चर्चेला जोर आला आहे.

बारामती मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला, भोर विधानसभा मतदारसंघ येतात. पुनर्रचनेनंतर मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांची ताकद समान आहे. इंदापूर, भोर, पुरंदरमध्ये कॉंग्रेसची ताकद लक्षवेधी आहे. इंदापूर, भोर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे यांचा विधानसभा मार्ग सुकर होणार असल्याचे संकेत आहेत. पुरंदरमधील राष्ट्रवादीतील दुफळी आणि पाडापाडीचे राजकारणाचा फटका यापूर्वी विधानसभेला बसला होता. पुरंदरच्या संजय जगताप यांनी आघाडी धर्माचे तंतोतत पालन केले आहे. त्यामुळे पुरंदरला राष्ट्रवादीतील दुफळीला तिलांजली देऊन पुरंदरचा गड कॉंग्रेसच्या ताब्यात जाण्याची शक्‍यता आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत सलोखा निर्माण करणाऱ्या पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पाटील यांनी राजकीय पैऱ्याची सल कार्यक्रमातून उलगडून दाखविली होती.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत पाटील वेगळा निर्णय घेतील, अशी शक्‍यता होती. मात्र, आघाडी धर्म पाळला. भोर, पुरंदर तालुक्‍यातील कॉंग्रेसचा गट सुळे यांच्या मदतीला धावला. लोकसभेला कॉंग्रेसची मोट विस्कळीत होती. त्यात राज्यातील महत्वाचे चेहरे अडगळीत गेले होते. शरद पवार यांनी आघाडी धर्माचे पालन करीत अनेक ठिकाणी जागा वाटपात आघाडी घेतली होती. यात बारामतीची जागा सुरक्षित केली होती. याच दरम्यान पाटील यांच्याशी पवार कुटुंबीयांचे सलोख्याचे सूर जुळले. बावडा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांना राष्ट्रवादीने साथ दिली. यातून आगामी राजकारणाचे संकेत मिळाले आहेत. लोकसभेनंतर दोन्ही कुटुंबीयांची ओढ, जवळिकता इंदापूर तालुक्‍यात चर्चेचा ठरत आहे. कॉंग्रेसचा चेहरा असलेले पाटील यांना इंदापूर तालुक्‍यातून एकतर्फी विजय मिळवून देऊन राज्यात प्रचारात महत्वाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील तुल्यबळ इच्छुकांना थंड करण्यात राष्ट्रवादीला नाकीनऊ येणार आहे. दिल्ली भेटीतील संदर्भाला आणखी बळकटी आली आहे. सहा महिन्यांपासून दोन्ही कुटुंबीयांतील सलोखा सकारात्मक संकेत देणारे आहेत. दोन्ही कुटुंबीयाची इंदापूर तालुक्‍यात राजकीय मशागत सुरू आहे. पवार कुटुंबीयातील चौथी पाती आणि पाटील कुटुंबीयातील तिसरी पाती यांच्यातील राजकीय स्नेह राजकारणाची दिशा बदलून टाकणारा ठरत आहे.

पाटील यांना सबुरीचे फळ
राजकारणात श्रद्धा आणि सबुरी गरजेची आहे. हायकमांडवरील श्रद्धेचे फळ आमदार भरणे यांना मिळाले आहे. तसेच बेरजेचे राजकारण करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना सबुरीचे फळ मिळाले आहे. 1995 पासून हर्षवर्धन पाटील यांनी तीन टर्म आमदारकी भूषविली होती. मात्र, मागील लोकसभेला पाटील यांनी सुळेंसाठी आघाडी धर्म पाळला होता. त्यानंतर विधानसभेला आघाडी तुटली. त्यामुळे राष्ट्रवादीने भात्यातील दत्तात्रय भरणे यांचे अस्त्र सोडले. त्याचा फटका पाटील यांना बसला आहे. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्या वर्षभरातील बेरजेचे राजकारण दोन्ही कुटुंबीयात वाढलेली दरी सांधण्यात महत्वाची ठरत आहे.

चौथ्या पातीची तिसऱ्या पातीशी स्नेह
शरद पवार यांच्या कुटुंबातील चौथी पिढी आता राजकारणात सक्रिय आहे. इंदापूर तालुक्‍यात पाटील यांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. शरद पवार यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शारदा पवार, शरद पवार, अजित पवार, रोहित पवार अशा चार पिढ्या आहेत. पवारांची चौथ्या पिढीने पाटील घराण्याशी जुळवून घेतले आहे. दिल्ली भेटीतील फोटा तालुक्‍यात व्हायरल झाल्यानंतर इंदापूरचा गड कोणाकडे जाणार, या चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.