मुंबई – शिवसेना खासदार भावना गवळीही गेल्या काही काळापासून ईडीच्या टप्प्यात आल्या आहेत. त्यांच्याशी संबंधित संस्थांची काही आठवड्यांपूर्वी झडती झाली होती. आता त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जर गवळी या चौकशीसाठी गैरहजर राहील्या तर त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले जाण्याची शक्यता सूत्रांच्या हवाल्याने व्यक्त करण्यात आली आहे.
भावना गवळी या यवतमाळच्या शिवसेना खासदार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या पाच संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्याआधी भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याची तक्रार ईडीकडे केली होती.
दरम्यान, माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, असे भावना गवळी कारवाईनंतर म्हणाल्या होत्या. माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा, अशी मागणीही त्यावेळी भावना गवळी यांनी केली होती.