आयपीएलसाठी खेळाडूंची जोरदार तयारी
मुंबई – आयपीएल स्पर्धा अमिरातीत होत असून त्यासाठी आतापासूनच स्थानिक खेळाडूंनी आपापल्या शहरात सराव सुरू केला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा व किंग्ज इलेव्हन पंजाबचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल यांच्यासह दुसऱ्या फळीतील खेळाडूंनी सरावाला प्रारंभ केल्यानंतर आता खऱ्याअर्थाने स्पर्धेचा माहोल निर्माण झाला आहे.
आयपीएलचा यंदाचा मोसम मार्चपासून सुरू होणार होता. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा बीसीसीआयने लांबणीवर टाकली. आता अमिरातीने दिलेला प्रस्ताव मान्य करत या स्पर्धेचे आयोजन तिथे केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ व सपोर्ट स्टाफ येत्या गुरुवारी अमिरातीला रवाना होणार आहे. त्यापूर्वी सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी ज्या खेळाडूंना शक्य आहे त्यांना सरावाची परवानगी देण्यात आली आहे. रोहितही लॉकडाऊनमुळे घरातच होता मात्र, आता त्याने सरावासाठी मैदानात पाऊल ठेवले व त्याच्या सरावाचे फोटो मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
भारत व न्यूझीलंड यांच्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात टी-20 मालिका खेळवली गोली होती, त्यानंतर रोहित दुखापतीमुळे मायदेशी परतला होता. आता इतक्या मोठ्या खंडानंतर तो मैदानावर परतला आहे. तसेच यंदा पंजाब संघाचे नेतृत्व करत असलेला लोकेश राहुल यानेही सरावास सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी सज्ज होण्यासाठी येत्या आठवड्यात अमिरातीत दाखल झाल्यानंतर तसेच चाचणी झाल्यानंतर सर्व संघांचे खेळाडू तेथील शिबिरात सराव करणार आहेत. या खेळाडूंची स्पर्धेपूर्वी तसेच स्पर्धा सुरू असताना वारंवार करोना चाचणी होणार आहे.