पणजी :- महाराष्ट्राने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवला. महाराष्ट्राने तब्बल 80 सुवर्ण, 69 रजत, 79 ब्रॉंझ अशी एकूण विक्रमी 228 पदके मिळवली. सर्वाधिक सुवर्णपदके प्राप्त करत यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान संपादन केला.
– 80 सुवर्ण, 69 रजत, 79 ब्रॉंझसह विक्रमी 228 पदके
– जिम्नॅस्ट संयुक्ता काळे सर्वोत्तम महिला क्रीडापटू
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या वतीने क्रीडामंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर आणि पथक प्रमुख स्मिता शिरोळे यांनी हा चषक स्वीकारला. 1994 सालानंतर 29 वर्षांनी हे विजेतेपद महाराष्ट्राने पटकावले. जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळेने सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा चषक पटकावला.
यंदा गतविजेते सेनादल (66 सुवर्ण, 27 रजत, 33 ब्रॉंझ अशी एकूण 126 पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (62 सुवर्ण, 55 रजत, 75 ब्रॉंझ अशी एकूण 192 पदके) तिसऱ्या स्थानावर राहिले. महाराष्ट्राची जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळे आणि पश्चिम बंगालच्या प्रणोती नायक यांना सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराज सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू ठरला.
अखेरच्या दिवशी योगासनांमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्णपदके पटकावली. नेमबाज अभिज्ञा पाटीलने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाला 200 पेक्षा अधिक पदके जिंकता आलेली नाहीत. म्हणूनच 228 पदके जिंकून यंदा महाराष्ट्राने दिवाळी साजरी केली आहे.
पदकविजेत्या खेळाडूंना बक्षिस
महाराष्ट्राच्या पदकविजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्ण, रजत व ब्रॉंझ पदकांसाठी अनुक्रमे सात लाख, पाच लाख व तीन लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे, असे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी नमूद केले.
योगासनातही सर्वसाधारण विजेतेपद
योगासने क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राने अखेरच्या दिवशी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्र संघाने एकंदर 5 सुवर्ण, 3 रजत आणि 1 ब्रॉंझ अशी 8 पदके जिंकून योगासन क्रीडा प्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
नेमबाजीत अभिज्ञाला सुवर्णपदक
महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णलक्ष्य साधण्यात यशस्वी ठरली. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटीलचे पदक मात्र थोडक्यात हुकले.