हडपसर – महंमदवाडी परिसरातील नागरिकांची आता वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. कारण परिसरात 122 कोटींचे डीपी रस्ते निर्माण होत आहेत. शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी प्रशासनांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प तडीस जात असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
प्रशासनाने या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.
भानगिरे यांनी पुढे सांगितले कि, या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष दिल्याने निधी मिळण्यास गती मिळाली. मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनासोबत सातत्याने संवाद साधून निधीची तरतूद करून दिली.
यामुळे हा प्रकल्प आता लवकरच आकाराला येईल. महंमदवाडी परिसरात अशा पद्धतीनं होणार आहेत रस्ते महंमदवाडी स नं 1, 2, 3, 4, 96, 59, 58 मधून जाणारा 24 मीटर डीपी रस्ता विकसित करणे – निधी 40 कोटी, स नं 40 ते स नं 76 मधून जाणारा 30 मीटर डीपी रस्ता लगत असलेला 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे – निधी : 18 कोटी,
महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट पर्यंत रस्ता विकसित करणे – निधी : 64 कोटी असा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून कामही युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे.असेही भानगिरे यांनी सांगितले.
महंमदवाडी परिसरातील शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची मागणी होती, कि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी डीपी रस्ते तयार केले जावेत. मात्र ,यासाठी निधीची तरतूद होत नव्हती.
त्यामुळे आम्ही प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करून रस्ते तयार करण्यासाठी निधीची तरतूद करून घेतली. त्यानुसार आता कामाचा शुभारंभ झाला आहे. महंमदवाडी परिसरातील रस्ते चकाचक होऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
– प्रमोदनाना भानगिरे, शहरप्रमुख , शिवसेना पुणे शहर