पुणे – सार्वजनिक क्षेत्रातील ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स या बॅंकेने आपल्या “एमसीएलआर’ या दरात 0.05 ते 0.15 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस आधारित कर्जव्याजदर “एमसीएलआर’ बॅंकेने आपल्या एकूण कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही व्याजदर कपात 10 जानेवारीपासून अंमलात आली असल्याचेही बॅंकेने स्पष्ट केले आहे. बॅंकेने आपला एक वर्षासाठीचा “एमसीएलआर’ 0.15 टक्क्यांनी कमी करून तो आता 8.15 टक्के केला आहे. त्या आधारावर बहुतांश कर्जाचे व्याज दर ठरविले जातात.
ओव्हर नाइट ते 6 महिन्यांसाठीचा “एमसीएलआर’ बॅंकेने 0.05 टक्के ते 0.10 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यांत आपल्या रेपो दरात कपात न करूनही दरम्यानच्या काळात स्टेट बॅंकेसह बऱ्याच बॅंकांनी आपल्या कर्ज आणि ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. गेल्या काही तिमाहीपासून कर्जाचा उठाव वाढत नसल्यामुळे बॅंका कर्जावरील व्याजदर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी काळातही काही बॅंका आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.