नगर -येथील पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट व पद्मनादम् ढोल-ताशा ध्वज पथकाच्या वतीने दरवर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाचे आरोग्य दैवत मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या वर्षी करोनाच्या संकटामुळे हा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे.
त्याऐवजी पद्मशाली समाजातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवतींसाठी माझी कला माझी ओळख’ या अनोख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पद्मशाली युवा शक्तीचे अजय म्याना यांनी दिली.
यामध्ये रांगोळी, आकर्षक राखी बनविणे, चित्रकला व प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे. या स्पर्धा 4 गटात संपन्न होतील. पहिला गट पहिली ते चौथी, दुसरा गट पाचवी ते सातवी, तिसरा गट आठवी ते दहावी व खुला अशा गटांत होतील.
सोमवार (दि.3) रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी अजय म्याना, शुभम बुरा, दीपक गुंडू, योगेश म्याकल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने करण्यात आले आहे.