पुणे – पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ब्रेनडेड महिलेने अवयवदान केले असून, तिच्या 21 वर्षीय मुलाने आणि अन्य नातेवाइकांनी यासाठी सहमती दिल्याने हे शक्य झाले. पुणे विभागातील या वर्षीचे हे 20 वे अवयवदान आहे. यामुळे तीन जणांना जीवदान मिळाले आहे.
पुण्यामधील एका खासगी रुग्णालयात 51 वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले. तिला झटके येत होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मेंदू मृत झाला होता. ही महिला विधवा असून तिला 21 वर्षांचा मुलगा आहे. याविषयी माहिती मिळाल्यानंतर यासंदर्भात समन्वयकाची भूमिका पार पाडणाऱ्या रोहिणी सहस्रबुद्धे यांनी मुलाचे आणि नातेवाइकांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले.
त्यानंतर विचार करून त्यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) सहमती दर्शवली. यासंदर्भातील सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून या महिलेचे फुफ्फुस, यकृत आणि दोन किडनी दान केले. फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यात होत नसल्याने चेन्नई येथे ते पाठवले. तेथील रुग्णालयाने स्पेशल चार्टर प्लेनने ते फुफ्फुस चेन्नई येथे नेले. तसेच यकृत पुण्यातील बिर्ला रुग्णालयात तर दोन्ही किडनी रुबी हॉल रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी नेण्यात आल्या. स्वादुपिंड आणि हृदय हे प्रत्यारोपण योग्य नसल्याचे तपासाअंती लक्षात आल्याने त्याचे दान होऊ शकले नाही.