बीजिंग- चीन आणि रशियाच्या नौदलामध्ये संयुक्त युद्धसराव नियोजित केला गेला आहे. रशियाच्या समुद्रामध्ये हा युद्धसराव केला जाणार आहे. या युद्धसरावासाठी चीनच्या नौदलाची जहाजे रशियाकडे रवाना झाल्याची माहिती चीनच्या नौदलाकडून आज देण्यात आली. रशियाकडून युक्रेनवर लादलेल्या युद्धामुळे जगभरातून रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले गेले आहेत. या पार्श्वभुमीवर चीनकडून रशियाशी जवळीक अधिकच वाढवली जाते आहे. रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धामध्ये चीनने प्रथमपासूनच तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र रशियाला चीनचा पाठिंबा असल्याप्रमाणेच चीनचे वर्तन होते. अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देश रशियाला युद्धासाठी चिथावणी देत आहेत, असा आरोप चीनने केला होता. रशियावर आर्थिक आणि व्यापारी निर्बंध घातले गेले असतानाही चीनकडून मात्र या निर्बंधांच्या विपरीत रशियाशी व्यापारी आणि आर्थिक संबंध दृढ केले जात होते. रशिया आणि चीनच्या नौदलामध्ये होणाऱ्या युद्धसरावामध्ये 10 पेक्षा जास्त युद्धनौका आणि 30 पेक्षा जास्त लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. या युद्धसरावाबाबत चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ आणि माहिती मंत्रालयाच्यावतीने अधिक तपशील देण्यात आलेला नाही. मात्र जपानच्या समुद्रामध्ये आगामी काही दिवसातच हा युद्धसराव होणार असल्याचे समजते आहे.