कोल्हापूर – राज्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जीवित व वित्तहानी झालेली आहे. गत चार दिवसात होत असलेली अतिवृष्टी व त्यामुळे होऊ शकणारे परिणाम याबाबत गांभिर्याने विचार केला नाही. नियोजन, विभागांतर्गत समन्वय याचा अभाव व नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे, याला राज्य सरकार व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘मुंबई-बंगळूरू महामार्ग मागील पाच-सहा दिवसांपासून ठप्प आहे. पुरात सापडलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचत नाही. एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा अत्यंत तोकडी पडलेली आहे. मुख्यमंत्री आधी प्रचार यात्रेत मश्गूल होते तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीही फारसे गांभिर्याने पाहिले असा आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यावरचे संकट मोठे असून त्याला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावे अशी मागणी केली आहे.