केडगाव- सहजपूर (ता. दौंड) येथील शारदा विद्यालयात आरोग्य विभागाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 8 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून आरोग्य विभागातर्फे परिसरातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या येथे जाऊन 1 ते 19 वयोगटांतील सर्व मुलांना एल्बेडेझॉल-400 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
शाळाबाह्य मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा करण्यात आली, असून 8 ऑगस्ट रोजी गोळी द्यायची राहून गेल्यास 16 ऑगस्टला देण्यात येणार आहे, त्यावेळी मुलांना आरोग्य केंद्रात घेऊन यावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सहजपूर येथे गोळ्या वाटप करताना मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आरोग्य विभागाचे आणि आशा कर्मचारी उपस्थित होते.