पिंपरी – भगवान श्रीराम मंदिराच्या स्वच्छता व्यवस्थापनाची जबाबदारी पिंपरी चिंचवड शहरातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून, कोट्यवधी भाविकांच्या चरण धुळीची स्वच्छता सेवा करण्याचे काम मिळाले आहे, अशी माहिती बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी दिली.
मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होईल. कोट्यवधी भाविकांच्या चरण धुळीची स्वच्छता सेवा करण्याचे काम मिळाले आहे. या विषयी बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हणमंत गायकवाड म्हणाले की, बीव्हीजी इंडिया लिमिटेड या माझ्या कंपनीला श्री रामलल्ला गर्भगृहासहित संपूर्ण रामलल्ला मंदिर, यात्री सुविधा केंद्र, सर्व स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ते व इतर स्थानांच्या स्वच्छता सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. बीव्हीजी यासाठी पर्यावरणपूरक व बायोडिग्रेडेबल स्वछता सामग्रीचा वापर करत आहे. देशातील भाविकांच्या अत्यंत वर्दळीच्या २० मंदिरांमध्ये सध्या आम्ही सेवा देत आहोत. परंतु, श्री राम मंदिराने या सर्व सेवांवर कळस चढविला आहे. या सेवेकरिता जवळपास २०० स्वच्छता सेवकांची नियुक्ती करत असून, ५० लाख रुपयांची अत्याधुनिक मशिनरी खरेदी करून त्याद्वारे स्वच्छता सेवा सुरू केली आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
भारत विकास ग्रुप ही उद्योजक हणमंत गायकवाड स्थापित कंपनी ही एकात्मिक सेवा पुरवठा करणारी कंपनी आहे. ज्यामध्ये राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय व निवास, नवे व जुने संसद भवन, सुप्रीम कोर्ट, यासह शासकीय व निमशासकीय अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये तसेच देशातील २४ महत्त्वाची विमानतळे, २० प्रमुख मंदिरे व शेकडो खासगी कंपन्या व आस्थापनांना बीव्हीजी इंडिया लिमिटेड ही कंपनी सेवा देते. बीव्हीजी उद्योग समूह विविध क्षेत्रात कार्यरत असून, सध्या ८०,००० पेक्षा जास्त कर्मचारी या समूहात आहेत.
देशातील इतर स्वच्छता सेवा देणाऱ्या कंपन्यांमधून श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाने सर्वोत्तम दर्जाच्या निकषावर बीव्हीजी इंडिया लिमिटेडचीच निवड केली, हा मी माझा सन्मान समजतो. प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने मनातील मळ दूर होईल, भाविकांच्या पायाची धूळ साफ करण्याचे सौभाग्य मला मिळाले, हा माझ्या आतापर्यंतच्या कार्याचा सन्मान झाला असे मला वाटते.
– हणमंत गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, बीव्हीजी इंडिया लिमिटेड