पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये स्टाॅलधारकांनी केलेल्या अतिक्रमणांवर अखेर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली आहे. महापालिकेकडून या बांधकामांना नोटीस देऊन केवळ दाखविण्यापुरती कारवाई केली होती. मात्र, माध्यमांनी महापालिकेच्या या काराभाराचे वाभाडे काढल्यानंतर उशिरा का होईना, पण जागे झालेल्या बांधकाम विभागाने येथे कारवाई करत अनधिकृत बांधकाम मंगळवारी सकाळी जमीनदोस्त केले.
बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिरामागे स्वामी समर्थ गृहरचना संस्था आहे. सुमारे आठ गुंठ्याच्या जागेत २१ सदनिकांची ही १९९५ मध्ये बांधलेली सोसायटी आहे. येथे सुमारे ४२ दुचाकी व ८० सायकलचे पार्किंग बांधकाम परवानगीमध्ये मंजूर आहे. पण गेल्या अनेक वर्षात येथे पार्किंग, साइड मार्जिनमध्ये अनधिकृतपणे दुकाने, खोल्या बांधून त्याचा व्यावसायिक वापर सुरू आहे. गेल्या वर्षी या सोसायटीचे कन्व्हेयन्स डीड झाल्यानंतर अध्यक्षांनी मे २०२३ मध्ये अनधिकृत बांधकामासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली.
मात्र, त्यानंतर जवळपास सात महिने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांच्या लोकशाही दिनात या प्रकरणी कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. त्यावर बांधकामे अनधिकृत असल्याने त्यांना नोटीस देण्यात आल्या. मात्र, त्यानंतर केवळ जुजबी कारवाई करून पालिकेचे पथक परतले होते. त्यानंतर, तक्रार मागे घ्यावी मागणी सोसायटीमधील नागरिकांवर दबाव टाकला जात होता.
मात्र, माध्यमांनी ही बाब समोर आणल्यानंतर बांधकाम विभागाने हे सर्व बांधकाम काढून टाकत पार्किंग रिकामे केले आहे. त्यामुळे महापालिकेने शहराच्या इतर भागातील बांधकामेही इच्छाशक्ती दाखवून काढून टाकावीत, अशी मागणी केली जात आहे.