भोर, (प्रतिनिधी) – भोर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील 14 वकिलांना नोटरीपदावर निवड झाली आहे. गुरुवारी (दि. 14) 14 हजार 648 नोटरीपदी नियुक्ती झालेल्या वकिलांची यादी जाहीर केली. यामध्ये भोर न्यायालयात वकिली करणार्या 14 वकिलांचा समावेश आहे.
कायदेशीर दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणजे नोटरी. व्यवहार योग्यरितीने पार पाडले जातील, याची खात्री करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात, नोटरीची नियुक्ती सरकारी प्राधिकरणामार्फत केली जात असली, तरी सरकारकडून मोबदला मिळत नसल्याचे अॅड. विजय दामगुडे यांनीसांगितले.
काही कायदेशीर कार्ये करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे, कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवह्रांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार नोटरीद्वारे वकिलांना प्राप्त होतो. वकिली व्यवसायात पदार्पण केल्यानंनर 10 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाइन मुलाखती पार पडल्या. केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात नोटरीधारक नियुक्त्या केल्यामुळे नागरिक, विद्यार्थी व व्यावसायिकांची सोय होणार आहे.
यापूर्वी भोर न्यायालयातील केवळ सहा वकिलांची नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामध्ये सोपान कोंढाळकर, त्र्यंबकराव देशमुख, दीपक चौधरी, मुकुंद तांबेकर, सुवर्णा बदक व राजेंद्र मोरे यांचा समावेश आहे. यामुळे भोर न्यायालया अंतर्गत नोटरीधारक वकिलांची संख्या 20 झाली आहे.
या वकिलांची निवड
अॅड. विजय दामगुडे (भोर), दीपक बोरकर (ससेवाडी), शिवाजी मरळ (केळवडे), शिवाजी पांगारे (वेळू), यशवंत शिंदे (शिंदेवाडी), विठ्ठल दुधाणे (भोर), शिल्पा काळे (भोर), अश्विनी कुलकर्णी (भोर), कल्पना मस्के (नसरापूर), आशा बांदल (संगमनेर), दत्तात्रेय उरुणकर (कासुर्डी), सचिन कदम (भोर), किरण घोणे (भोर), आणि आर. एल कोंडे (केळवडे).