नवी दिल्ली – पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे, असा थेट इशाराच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. यामुळे पक्षातील विरोधक कोण आहे, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे कॉंग्रेसची मोठी कोंडी झाली होती.
नाना पटोले यांनी आज दिल्लीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. पण सोनिया गांधी यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी पक्षातील विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.
नाना पटोले म्हणाले, भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटायला आलो होतो, पण काही कारणामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असे पटोले म्हणाले.
पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे. ज्यांनी-ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे, अशांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. कॉंग्रेसचाच अध्यक्ष होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये नारायण राणे यांनी साम, दामदंडचा वापर करून निवडणूक जिंकली आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.
हे वर्ष अन्नदात्यासाठी कष्टदायी
हे वर्ष देशातील अन्नदात्यासाठी अत्यंत कष्टदायी व दुःखद असे ठरले. काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले असले तरी त्यासाठी शेतक-याला मोठा संघर्ष व त्याग करावा लागला. या संघर्षात शेतकरी बांधवांचा बळी गेला. अतिवृष्टी व अवकाळीने बळीराजाचे अतोनात नुकसान केले, असेही नाना पटोले म्हणाले.