दिल्ली वार्ता : ऑपरेशन कॉंग्रेस

-वंदना बर्वे

कॉंग्रेस हा रेंगाळत चालणारा पक्ष आहे. काहीही झालं तरी घाईगडबडीनं काहीही करायचं नाही, असा या पक्षाचा इतिहास आहे. मात्र, हा इतिहास झाला. कॉंग्रेसने आता तातडीने निर्णय घेण्याचा मार्ग अवलंबिला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

कॉंग्रेस संघटना आणि नेतृत्वाला कार्यशैली बदलण्याची सल्लावजा ताकीद देणारे पत्र कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. या घटनेला जेमतेम 20-22 दिवस झाले आहेत. हे पत्र प्रसारमाध्यमांना देऊन या नेत्यांनी पक्षाची शिस्त मोडली होती. यामुळे पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, एवढ्या तातडीने कारवाईची कुऱ्हाड चालविली जाईल, याची कुणालाही अपेक्षा नव्हती. कारण, कॉंग्रेसचा तसा इतिहास नाही. शिस्तभंगाची फाईल हळूहळू रेंगाळत चालायची. मग सहा महिने वर्षभराने लहान-मोठी कारवाई केली जायची किंवा इकडून तिकडे पाठविले जायचे. परंतु, आता महिना संपायच्या आधी पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कॉंग्रेसने कारवाई केली. तीसुद्धा साधीसुधी नाही तर “मेजर ऑपरेशन’ केले. एका क्षणात पाच-पाच महासचिवांच्या हातात नारळ देण्याची घटना कॉंग्रेसच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडली असावी.

याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्या हाती असले तरी सगळी सूत्रे राहुल गांधी यांच्याच हाती आहे. पत्राच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या 23 नेत्यांना आरसा दाखविण्यात आला. लेटर बॉम्ब फोडणाऱ्या नेत्यांनी कुठे पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी केली होती आणि कुठे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, मल्लिकार्जुन खर्गे आणि अंबिका सोनी अशा पाच जणांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे.

माजी मंत्री कपिल सिब्बल, भूपेंदरसिंग हुडा, शशी थरूर, राज बब्बर आणि मनीष तिवारी यांना नावासाठीसुद्धा ठेवण्यात आले नाही. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे पंख आधीच छाटण्यात आले होते. मात्र, कॉंग्रेसला शरण आल्यानंतर त्यांना कुठे तरी जागा दिली जाईल अशी चर्चा होती. परंतु, त्यांच्याकडे ढुंकूनही बघण्यात आलेले नाही. कॉंग्रेस कार्यसमितीमध्ये मात्र या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यात सोनिया गांधी, राहुल गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, अंबिका सोनी आणि अँटोनीसह 22 जणांना स्थान देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नेते मुकुल वासनिक यांचे महासचिव पद कायम असून त्यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनविण्यात आले आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव गुजरातचे प्रभारी आहेत. तर, रजनी पाटील यांना जम्मू काश्‍मीरचे प्रभारी बनविण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे नाव सोनिया गांधी यांचे असले तरी ऑपरेशन करणारे खरे डॉक्‍टर राहुल गांधी होय. कॉंग्रेसमध्ये नवीन समिती बनविण्यात आली आहे. ही समिती पक्षाचा गाडा हाकण्यासाठी सोनिया गांधी यांना मदत करणार आहे. सोनिया गांधी यांना सल्ला देणाऱ्या समितीत विश्‍वासपात्र लोकांना स्थान देण्यात आले आहे. यात अँटोनी, पटेल, अंबिका सोनी, वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि सुर्जेवाला आहेत. मधुसुदन मिस्त्री यांना निवडणूक समितीचे प्रमुख बनविण्यात आले आहे.

प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनविण्यात आले आहे. याशिवाय कर्नाटकचे नेते दिनेश गुंडूराव मणिकम आणि एच. के. पाटील यांना केंद्राच्या राजकारणात आणण्यात आले आहे. प्रभारीपदसुद्धा विश्‍वासपात्रांना देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर महाराष्ट्राचे नेते नाराज होते. शिवाय, खर्गे यांना राज्यसभेवर आणण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यावर कारवाई केल्यानंतर राज्यसभेतील कॉंग्रेसचे नेतेपद खर्गे यांना मिळणार यात शंका नाही.
महाराष्ट्राचे प्रभारीपद एच. के. पाटील यांच्या हाती सोपविण्यात आले आहे. पाटील यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते लोकनेते आहेत. राज्याचे प्रभारीपद जी हुजुरीमुळे नव्हे तर कर्तव्यतत्पर आणि लोकनेते असल्यामुळे मिळाले आहे. कर्नाटकचे व्हिजिनरी नेते अशी त्यांची ओळख आहे. स्वतः एक ब्रॅंड आहे. लोकांची नाडी ओळखण्यात ते पटाईत आहेत. मराठी पार्श्‍वभूमीचे आहेत. गटबाजीमध्ये विश्‍वास न ठेवणारे आहेत. या सर्व गोष्टींचा पक्षाला फायदा होईल हे समजूनच त्यांना प्रभारी बनविण्यात आले आहे.
रणदीप सुर्जेवाला यांना कर्नाटकचे प्रभारी बनवण्यात आले आहे. हरीश रावत यांना पंजाब, ओमान चंडी यांना आंध्र प्रदेश, तारिक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीप, जितेंद्र सिंह यांना आसाम तर अजय माकन यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे पक्षसंघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधींचे विश्‍वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनकीन टागोर यांना तेलंगणच्या प्रभारीपदी नियुक्‍त करण्यात आले आहे.

एकंदरीत काय तर, गटबाजी करून पक्षाला वेठीस धरणाऱ्यांचे दिवस मावळले आहेत, असा संदेश राहुल गांधी यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांची प्रतिमा उंचावत चालली आहे. त्यांची जी प्रतिमा विरोधकांनी तयार केली होती ती राहुल गांधी यांनी स्वबळावर पुसून काढली आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने कुणी समाचार घेतला असेल तर ते म्हणजे राहुल गांधी. याच काळात हजारो किलोमीटरची पदयात्रा करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या भेटीला राहुल गांधी गेलेत. या भेटीमुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यानंतरही त्यांचीच फजिती झाली.

राहुल गांधी यांनी केलेल्या या ऑपरेशनचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, लोकनेत्यांना पुढे आणण्यात आले आहे. आतापर्यंत जी हुजरेगिरी करणारे नेतृत्वाची दिशाभूल करून पदांवर कब्जा करीत होते. मात्र, यावेळेस सर्वांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.