आपला चातुर्मास : अधिकमास

-अरुण गोखले

मानवी मनातल्या जिज्ञासावृत्तीमुळेच त्याची प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रगती होत असते. दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास म्हणजे काय? तो का येतो? त्याचे महत्त्व काय? या महिन्यात केलेल्या स्नान, दान, पूजा आणि व्रते ह्याचे महत्त्व काय? बरं या गोष्टी तरी का आणि कशासाठी करायच्या? या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला पद्मपुराण आणि बृह्‌ननारदीय पुराणातील अधिकमास माहात्म्यात वाचायला मिळतात.

आपल्याकडे होणारी कालगणना ही सौरवर्ष आणि चांद्रवर्ष अशा दोन प्रकारांनी केली जाते. आपला पंचांगाचा दिवस हा सूर्योदयापासून सुरू होतो, तर इंग्रजी कॅलेंडरची तारीख आणि दिवस हा रात्री बारा वाजता बदलतो. या दोन्ही प्रकारच्या कालगणनेत दरवर्षी साधारणपणे 10 ते 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनंतर एका जास्त मासाची म्हणजेच अधिकमासाची योजना केलेली आहे.

या अधिक मासात हे सूर्याचे राशी भ्रमण होत नसते. सूर्य संक्रमण, सूर्य संक्रांत नसलेल्या या महिन्यातील नैसर्गिक वातावरण हे गढूळ आणि मलिन असते. त्यावरूनच या महिन्याला मलमास असेही म्हणतात. यास ग्रामीण भाषेत “धोंडा महिना’ असेही म्हणतात.

मलमास जेव्हा भगवान श्रीगोपालकृष्णास शरण गेला. तेव्हा त्यांनी त्याचा स्वीकार करून त्यास आपले पुुरुषोत्तम हे नाव बहाल केले. त्यावरूनच ह्या महिन्यास “पुरुषोत्तम मास’ असे म्हटले जाते. या महिन्यात केलेल्या व्रताचरणाचे मनुष्यास अधिक पटीने पुण्य प्राप्त होईल आणि त्याचे जीवन सुखी, समाधानी आणि ईश्‍वरी कृपांकित होईल असे वरदान स्वत: श्रीकृष्णाने या मासास दिलेले आहे.

अधिकमासातील व्रताचरण प्रश्‍न असा की, नेमके काय करायचे? या संदर्भात जे मार्गदर्शन केले जाते ते असे की, प्रत्येकाने आपले प्रकृतीमान, क्षमता ह्यांचा विचार करून आपल्याला काय झेपेल? काय सहजतेने करता येईल ह्याचा आधी नीट विचार करावा. यथाशक्‍ती यथामती ज्यास जे जमेल ते मात्र त्याने श्रद्धापूर्वक अवश्‍य करावे.

साधारणपणे या अधिकमासाची पर्वणी साधून आपण पुढील गोष्टी नक्‍कीच करू शकतो. जसे की रोज पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नान करावे, देवपूजा करावी. गोपालकृष्णाचे नामस्मरण करून त्यास तुलसीदल अर्पण करावे. देवापुढे तुपाचा दिवा लावावा. त्याचे पूजन करावे. दीपदान करावे. या महिन्यात अधिकमास माहात्म्याची पोथी किंवा कथासार वाचावे. रोज थोडा वेळ तरी मौन पाळावे. भोजन करीत असताना मौन राखावे. ज्यांना शक्‍य असेल त्यांनी उपवास करावेत. एकधान्य फराळ करावा. दूध फळांचे सेवन करावे.

भुकेलेल्या जीवांना अन्नदान करावे. गरजवंतांना धन, वस्त्र आदी दान करावे. ज्यांना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान, पूजा, दर्शन, दान करणे शक्‍य आहे, त्यांनी ते अवश्‍य करावे. संपूर्ण महिनाभर जर आपण एखादा नियम वा व्रताचरण केले असेल तर शेवटच्या दिवशी त्या व्रताची विधिवत सांगता करावी.

काय करावे ह्याचा विचार केल्यानंतर आता काय करू नये हेसुद्धा विचारात घेऊया. या मासात खोटे बोलू नये. खोटे वागू नये. कोणास निष्कारण दुखवू नये. शारीरिक आणि मानसिक शुचिता पाळावी. फसवणूक करू नये. आपण जर एखादे व्रताचरण करीत असलो तर शक्‍यतो बाहेरगावी जाऊ नये. परनिंदा, परपीडा करू नये. या मासातील जी महापुण्यदायी पंचपर्वे आहेत, ती साधून पुण्यकर्मे करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.