प्रा. डी. के. वैद्य
राजकीय इतिहासात पहिल्यांदा भाजपकडे स्थानिक स्वराज्य संस्था
अकोले – अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीवर माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांचा वरचष्मा राहिला. अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेवर म्हणजेच पंचायत समितीवर भाजपचा भगवा पहिल्यांदा फडकवला गेला आणि पक्षाच्या नावावर एक नवा इतिहास जमा झाला.
तीन महिन्यांपूर्वी विधानसभेची निवडणूक पिचड पिता-पुत्र हरले होते. मिनी विधानसभा म्हणून या पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीकडे पाहिले जाते. त्या मिनी विधानसभेवर त्यांनी आपली राजकीय खेळी करून आपला प्रवास भाजपमध्ये राहील यावर आजच्या निवडणूक निकालाने सिद्ध करून दाखवले.
विधानसभा निवडणुकीत पुत्राच्या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी घराबाहेर पडून माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. मात्र पराभवाने हताश झालेले वैभवराव पिचड मात्र दूरच होते. पिचड यांनी भाजपचे चार आणि आपल्याच बरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असणारे 4 असे आठ जण पंचायत समिती गणाचे सदस्य गट नोंदणीसाठी नगर येथे जिल्हा परिषदमध्ये नेले होते. मात्र त्यावेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोरख पथवे गेटच्या बाहेरुन पसार झाले.
पिचड यांनी सात जणांच्या गट बंधनाची नोंद करून समोरच्यावर आघाडी घेतली होती. मात्र माजी सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, संत नामदेव आंबरे, देवराम सामेरे या शिवसेनेच्या गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोरख पथवे यांना बरोबर घेतले आणि आपली एक वज्रमूठ कायम राहील असा प्रवास या दृष्टीने कायम ठेवला. सीताबाई गोंदके, माधवी जगधने, सारिका कडाळे यांना बरोबर घेऊन मोट बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना अपयश आले.
पिचड पिता-पुत्रांनी कमालीची गुप्तता पाळली.आपले सात सदस्य कोकण दौऱ्यावर पाठवले. त्यात एवढी गुप्तता पाळली गेली की त्यांचा ठावठिकाणा कोणालाही लागू शकला नाही. जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे आदींनी त्यांना देव दर्शन घडवीत सकाळी निवडणूक हॉलमध्ये हजर केले.
यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे प्रत्येकी चार सदस्य एकत्र आले आणि भाजपला दूर ठेवणारी एक यशस्वी राजकीय खेळी तर केलीच. शिवाय सर्वसाधारण गटातील सभापतिपद राखीव असताना संत नामदेव आंबरे यांना पदाने त्यावेळेसही आणि आजही गुंगारा दिला व तेव्हा शिवसेनेकडे म्हणजेच रंजना मेंगाळ व मारुती मेंगाळ या दोघांना अनुक्रमे सभापतीपद व उपसभापती पद मिळाले होते.
यावेळी मात्र पिचड पितापुत्रांनी भाजपचा झेंडा विधान मिनी विधानसभेवर फडकवायचा निर्णय केला होता. त्यांनी आपल्या हाती घेतलेला अजेंडा आज यशस्वी करून दाखवून प्रतिस्पर्धी आमदार किरण लहामटे व त्यांच्या गटाला अलगद धक्का देत पंचायत समितीच्या राजकारणापासून म्हणजेच मिनी विधानसभेपासून दूर ठेवले.